हिंदू-मुस्लीम प्रतापगडवर उसळला भक्तीचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:21+5:30
शुक्र वारी (दि.२१) प्रतापगडवर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व वर्षा पटेल यांनी भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले. हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगडावर जिल्ह्यात महाशिवरात्री पर्वावर सर्वात मोठी यात्रा भरते. विदर्भ व लगतच्या राज्यातून आबालवृद्ध महिला-पुरु ष, युवक-युवती व बालकांनी यावर्षी मोठी गर्दी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : हातात त्रिशुल, मुखात महादेवाचा गजर व हर बोला हर हर महादेव असा जयघोष करीत महाशिवरात्री पर्वावर लाखो भाविकांनी प्रतापगडच्या भोलेनाथ व दरग्यावर हजरत ख्वाजा उस्मान गणी हारूनी बाबांचे दर्शन घेतले. शुक्र वारी (दि.२१) प्रतापगडवर भाविकांची अलोट गर्दी उसळली होती. राज्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व वर्षा पटेल यांनी भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले.
हिंदू-मुस्लीम राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या प्रतापगडावर जिल्ह्यात महाशिवरात्री पर्वावर सर्वात मोठी यात्रा भरते. विदर्भ व लगतच्या राज्यातून आबालवृद्ध महिला-पुरु ष, युवक-युवती व बालकांनी यावर्षी मोठी गर्दी केली होती. ही यात्रा ५ दिवस चालणार असून महाशिवरात्री नंतर दोन सुटीचे दिवस आल्याने यावर्षी गर्दीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तिवली जात आहे. नवसाला पावणारा महादेव अशी प्रतापगडची सर्वदूर ख्याती आहे. यात्रेत नाना पटोले मित्र परिवारच्यावतीने पहिल्या पायरी जवळ महाप्रसाद वितरण करण्यात आले. येथे नामदार पटोले सकाळपासूनच बसून होते. तर मनोहर भाई पटेल अॅकेडमीच्यावतीने वर्षा पटेल यांनी महाप्रसादाचे वितरण केले. पोलिस प्रशासनाच्यावतीने कालीमाटी-प्रतापगड, कढोली-प्रतापगड व तिबेटकॅम्प-प्रतापगड या मार्गावर गावाबाहेर वाहने थांबविण्यात आल्याने भाविकांची थोडीशी गैरसोय झाली. नामदार पटोले यांच्या सुरक्षेसाठी महाप्रसाद स्थळी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. याठिकाणी यात्रेकरू त्यांची भेट घेत होते.
जनतेच्या मांगल्याचे मागणे
मनोहरभाई पटेल अॅकेडमीच्या अध्यक्ष वर्षा पटेल यांनी प्रतापगडला भेट देऊन गावातील शिवमंदिर व दरग्यावर जाऊन दर्शन घेतले. आपल्या परिसरातील जनतेच्या मांगल्याचे त्यांनी शिवशंकराला मागणे घातले. भाविकांच्या अडीअडचणी जाणून त्यांनी संवाद साधला. महाप्रसाद शामियान्यात त्यांनी भक्तजनांना महाप्रसाद वितरित केला. यावेळी त्यांच्यासोबत आ. मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते.
बळीराजात नवचैतन्य येऊ दे - पटोले
कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, त्यातही पिकांवरील किड शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजली आहे. वरुणराजाचीही वक्र दृष्टी असते. वरूणराजाने संतुलित बरसून शेतकऱ्यांत सुख-समृद्धी व नवचैतन्य येऊ दे असे साकडे पटोले यांनी भोलेशंकराला घातले. ३ दिवस सतत उपस्थित राहून प्राणप्रतिष्ठा, महायज्ञ व महाप्रसाद वितरण त्यांनी केले.
ध्वजारोहण आज
महाशिवरात्री पर्वावर दरग्यात मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने गर्दी करतात. ते दरग्यावर दर्शन घेऊन चादर चढवतात. शनिवारी (दि.२२) सकाळी ७ वाजता दरग्यावर ध्वजारोहण व कुराण पठण होणार आहे. दुपारी ३ वाजता शाही संदल काढला जाणार आहे. तर रविवारी (दि.२३) रात्री ९ वाजता वसीम साबरी कव्वाल दिल्ली व अहमदाबाद येथील फरीद सोला यांची दुय्यम कव्वाली होणार आहे. सोमवारी (दि.२४) फतिहा खाणी होणार असून महाप्रसादाचे वितरण होणार आहे.