जंगल सफारी बंद असल्याने वन्यजीवप्रेमींचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:03+5:302021-05-23T04:28:03+5:30
शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वत:साठी काढून मनमोकळेपणाने घालविण्यासाठी नागरिकांचा कल आता जंगलांकडे वळत आहे. सिमेंट काँक्रीटचे जंगल आता ...
शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ स्वत:साठी काढून मनमोकळेपणाने घालविण्यासाठी नागरिकांचा कल आता जंगलांकडे वळत आहे. सिमेंट काँक्रीटचे जंगल आता जीवघेणे ठरत असून यातून बाहेर पडण्यासाठी नागरिक निसर्गाच्या सान्निध्याचा शोध घेत आहेत. यासाठी वन पर्यटनाकडे नागरिक धाव घेत आहेत. असे असतानाच, जिल्ह्याला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हे एक वरदानच लाभले आहे. येथे जिल्हाच काय अन्य जिल्हे व राज्यातील नागरिकही जंगल सफारीसाठी येतात. परिणामी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची ख्याती आता दूरवर पोहोचली आहे.
मात्र, मागील वर्षापासून कोरोनाने देशात शिरकाव केला असून संपूर्ण व्यवस्थाच उद्ध्वस्त केली आहे. मागील वर्षी २४ मार्चपासून देशात लॉकडाऊन लागला होता व तेव्हापासूनच जंगल सफारी बंद करण्यात आली होती. आता यंदाही कोरोना फोफावल्याने १३ एप्रिलपासून व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी बंद करण्यात आली आहे. म्हणजेच, ऐन पीक सिजनमध्येच सलग दुसऱ्यांदा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीवर बंदी आली आहे. परिणामी, वन व वन्यजीवप्रेमींचा यंदाही हिरमोड झाला आहे.
-----------------------------------
वन विभागाचा महसूल बुडाला
जंगल सफारीतून वन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. येथे महसुलासाठी वन विभागाकडून जंगल सफारीची सूट दिली जात नाही. तर नागरिकांना वन व वन्यजीवांप्रती आकर्षण निर्माण व्हावे तसेच येणाऱ्या पिढीलाही निसर्गाचे फायदे समजून निसर्ग संवर्धनाबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश असतो. मात्र, तरीही यातून वन विभागाला महसूलही मिळतो. आता मागील वर्षापासून ऐन पीक सिजनमध्ये जंगल सफारी बंद करावी लागत असल्याने व विभागाचाही चांगलाच महसूल बुडत आहे.