ऐतिहासिक रॅलीने गजबजली नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:26 PM2019-06-28T21:26:17+5:302019-06-28T21:26:38+5:30
आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पर्यत असावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘सेव मेरीट-सेव नेशन’ आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२८) शहरात निघालेल्या रॅलीने नगरी गजबजली होती. सामान्य वर्गातील नागरिकांनी प्रथमच काढलेल्या या रॅलीत १५ हजारांवर नागरिकांनी भाग घेतल्याने शहरातील ही ऐतिहासिक रॅली ठरली. विशेष म्हणजे, या रॅलीत भाग घेत व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळत आपले समर्थन नोंदविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पर्यत असावी या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘सेव मेरीट-सेव नेशन’ आंदोलनांतर्गत शुक्रवारी (दि.२८) शहरात निघालेल्या रॅलीने नगरी गजबजली होती. सामान्य वर्गातील नागरिकांनी प्रथमच काढलेल्या या रॅलीत १५ हजारांवर नागरिकांनी भाग घेतल्याने शहरातील ही ऐतिहासिक रॅली ठरली. विशेष म्हणजे, या रॅलीत भाग घेत व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त बंद पाळत आपले समर्थन नोंदविले.
‘सेव्ह मेरीट-सेव्ह नेशन’ रॅलीची सुरूवात सकाळी १० वाजता येथील इंदिरा गांधी स्टेडियममधून झाली. या रॅलीपूर्वी संयोजक डॉ. उमेश शर्मा, डॉ. आनंद इसरका, डॉ. नितीन कोतवाल, देवरी येथील सुमित अग्रवाल यांनी विचार व्यक्त करीत या आंदोलनाला आजची गरज असल्याचे सांगितले. एकदा आरक्षण नामक कुबडीची लत लागल्याने ती लत कधी सुटत नाही. स्वातंत्र्याच्या वेळी १५ टक्क्यांपासून सुरू झालेले आरक्षण आत राज्यात ८५ टक्क्यांवर पोहचले आहे. जे उच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन आहे. एकंदर देशाचा मागासपणा मागील ७० वर्षांत १५ टक्क्यांवरून ८०-८५ टक्के टक्के झाल्याचे सांगितले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गांनी रॅली निघाली.
पश्चात, आयोजीत सभेत मंचावर डॉ.प्रमोद मुंदडा, अॅड. इंद्रकुमार होतचंदानी, माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल, डॉ.अर्चना कोठारी, डॉ.मनीषा मिश्रा, ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधी जगदीश शमा, सिख समाजाचे चरण जुनेजा, डॉ.काबरा, माधवदास खटवानी, अनिल हुंदानी, प्रकाश कोठारी, अरूण अजमेरा, लवली होरा, चिराग पटेल, चंद्रेश माधवानी, सीताराम अग्रवाल, (महालक्ष्मी), डॉ.निलेश जैन, डॉ.विकास जैन, डॉ.जूली जैन, डॉ.शेफाली जैन, डॉ.ऋतु जैन, डॉ. संजय अग्रवाल, डॉ.अनिता कोतवाल, डॉ.प्रणिता चिटणवीस, वामा महिला संघटन प्रमुख पूजा तिवारी, राजेंद्र बग्गा, शशि मिश्रा, डॉ.लक्ष्मी गुप्ता, अजय शामका, हर्षल पवार, कायस्त समाज के विनय श्रीवास्तव आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सिंधी समाजाचे प्रतिनिधि अॅड. होतचंदानी यांनी, संविधानात ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद नव्हती. मात्र राजकीय स्वार्थातून राज्यात ७८ टक्के पर्यंत आरक्षण जात असून हा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले. ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधी शर्मा यांनी, सामान्य वर्गातील जनता हजारोंच्या संख्येत पहिल्यांदाच रस्त्यावर उतरली असून न्याय मिळेपर्यंत त्यांचा हा लढा सुरू राहणार असल्याचे सांगीतले. माधवानी यांनी, महाराष्ट्र आमचा असूनही सरकार सामान्य वर्गासोबत अन्याय करीत आहे. सामान्य वर्गाने छत्तीसगड व मध्यप्रदेशात आपली ताकत दाखविली असून आता महाराष्ट्रात पाळी असल्याचे मत व्यक्त केले.
माजी नगराध्यक्ष अग्रवाल यांनी, बाबासाहेबांनी सादर केलेल्या संविधानाचे मूळ रूप बदलले असून यामुळेच सामान्य वर्गाला आज रस्त्यावर उतरावे लागल्याचे सांगितले. राजपूत समाजातील रूचीता चव्हाण यांनी, प्रतिभांचा सन्मान न झाल्यास त्यांना पळून जाणे हाच एकमात्र पर्याय उरणार व नव भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा लढा पुढेही सुरू ठेवावा लागणार असल्याचे मत व्यक्त केले. क्रांतीकुमार चव्हाण यांनी, प्रवेश न मिळाल्याने ९४ टक्के गुण घेणारे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. जुनेजा यांनी, सामान्य वर्गाच्या या लढ्याला सुरू ठेवण्याचे आवाहन केले. अॅड. ओमप्रकाश मेठी यांनी, या आंदोलनाला ऐतिहासिक सांगत अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. विठ्ठल मेश्राम यांनी, सामान्य वर्गाने काढलेली रॅली ऐतिहासिक असल्याचे सांगीतले.
विशेष म्हणजे, या रॅलीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील सामान्य वर्गातील नागरिक सहभागी झाले होते. संचालन श्री मारवाडी युवक मंडळाचे सचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार मंडळाचे अध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी मानले.
राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना पाठविले निवेदन
‘सेव्हमेरीट-सेव्ह नेशन’ या आंदोलनातंर्गत रॅली व सभा आटोपल्यानंतर आंदोलनाच्या प्रतिनिधी मंडळाने येथील नायब तहसीलदार राजेश भांडारकर यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन दिले. तसेच या निवेदनाची प्रत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या नावानेही देण्यात आली.
चौकाचौकांत पथनाट्य सादर
शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी रॅलीदरम्यान चौकाचौकांत ‘आरक्षणाचे दुष्परिणाम’ या विषयावर आधारीत पथनाट्य सादर केले.