मास्क न लावलेल्या 50 जणांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 05:00 AM2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:22+5:30
कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने जिल्हावासी बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना पुन्हा एकदा विदर्भात डोके वर काढत असल्याने पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढू नये यासाठी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर जोर दिला जात आहे. स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षेच्या उपाययोजना करण्याबाबत निरंतर माहिती पोलीस प्रशासन आठवडी बाजारात देत आहे. परंतु याकडे शहरातील नागरिक डोळेझाक करून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशात आता तिरोडा पोलीस पुन्हा कंबर कसून मैदानात उतरले असून रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मोहीम राबवून ५० जणांना दंड ठोठावला आहे.
कोरोनाची लस आली असली तरी प्रत्येकापर्यंत लस पोहचण्यासाठी बराच वेळ आहे. अशात नागरिकांनी कोरोना विषयक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे शासनाकडून सुरूवातीपासूनच सांगितले जात आहे. मात्र कोरोनाची लस आली असल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी असल्याने जिल्हावासी बिनधास्त झाले असून मास्क व शारीरिक अंतराचे पालन करण्यात कुचराई करीत आहेत. शहरातही नागरिक मास्क व लावता फिरत असून ठिकठिकाणी कोरोनाला न घाबरता गर्दी केली जात आहे. हा प्रकार धोकादायक असून जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही निर्बंध लावले असून मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.
याकडे लक्ष देत व शहरातील नागरिकांची बेपर्वाई बघून पोलिसांनी रविवारी (दि.२१) सकाळी ११ ते १२ वाजतादरम्यान अवंतीबाई चौकात मास्क न लावलेल्यांना दणका देण्यासाठी विशेष मोहीम राबविली. यामध्ये पोलिसांनी या एका तासात ५० जणांना पकडले असून त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपये नुसार पाच हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, आता गोंदिया शहरातही मास्क न लावणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली जात असून अवघ्या जिल्ह्यातच कठोरतेने ही मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. अशात आता ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर निघताना मास्क घालूनच घराबाहेर निघावे, शारीरिक अंतराचे पालन करावे व व्यापारी बांधवांनी सुद्धा मास्क घालून प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी कळविले आहे.
पोलीस ठाण्यात बसवून ठेवले
पोलिसांनी या मोहिमेंतर्गत मास्क न लावणाऱ्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेले व मैदानात बसवून ठेवले. याप्रसंगी त्यांना मास्क न लावण्यापासून होणारा धोका काय हे समजावून सांगण्यात आले. तसेच एक-एक करून दंड आकारून त्यांना सोडण्यात आले. तिरोडा पोलिसांच्या या प्रयोगाने शहरात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, तिरोडा तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. अशात नागरिकांनी अधिकच सतर्कतेने राहणे गरजेचे आहे.