ताण कमी करण्यासाठी खाकीतही जाेपासला जाताेय छंद ! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:53+5:302021-05-11T04:30:53+5:30
गोंदिया : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडताना पाेलीस दादांच्या खांद्यावर कधी कधी अतिरिक्त जबाबदारीही येन ठेपते. कुटुंबाकडे तर ...
गोंदिया : कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडताना पाेलीस दादांच्या खांद्यावर कधी कधी अतिरिक्त जबाबदारीही येन ठेपते. कुटुंबाकडे तर अक्षम्य दुर्लक्ष हाेते. ताणतणावात कर्तव्य बजावत असतानादेखील सर्वच बाबींवर लक्ष देत पाेलीस अधिकारी व कर्मचारी कार्य पूर्ण करतात. यातही काही अधिकारी व कर्मचारी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यास विसरत नाहीत. आपल्यामध्ये असलेल्या छंदाला कधी स्वत:साठी तर कधी सर्वांसाठी वाहून घेतात. गोंदिया जिल्हा पाेलीस दलातही असेच अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व दडून आहेत. यात पाेलीस कर्मचारी पोलीस विभागातील कुमार सानू म्हणून ज्यांची ख्याती आहे असे गोंदिया शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांचा समावेश आहे.
या सर्वांनी विविध कलेच्या माध्यमातून आपल्यामधील छंद विकसित करून इतरांनाही आनंदीमय जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे. आपल्या सभाेवताली वावरणाऱ्या व्यक्तींना आनंद कशा देता येईल, याच संधीत हे छंद जाेपासणारे पाेलीस कर्मचारी तत्पर असतात. त्यांचा हा छंद अनेकाना प्रेरणा तर देताेच परंतु इतरांना सुखावूनही जाताे. अशा कर्म व मर्म जाेपासणाऱ्या पाेलीस कर्मचाऱ्यांना लाखमाेलाचा सलाम आहे.
.....................
संगीतातून ताण कमी होतो
जीवनात कला असणे महत्त्वाचे परंतु कलेमुळे जीवन माेठे हाेणे ही माझ्यासाठी महत्त्वाची बाब ठरली. संगीत हेच माझे जीवन ठरले आहे. पाेलीस कर्तव्य निभावतानाही मी हा छंद कायम जपला आहे. गोंदिया पोलीस विभागात काम करतानाही कोरोनाच्या काळातही असलेला कामाचा ताण कमी करण्यासाठी संगीतातून मन प्रसन्न करीत असतो.
-महेश बनसोडे, पोलीस निरीक्षक, गोंदिया.
.........
वाचनात रमले मन
जीवनात अशा अनेक बाबी असतात त्या पूर्ण हाेत नाहीत. विविध पुस्तकांचे वाचन करणे हा माझा छंद आहे. वाचनातून आलेल्या अनेक गोष्टींची मार्मिक उदाहरणे आपल्या सवंगड्यांना व कर्मचाऱ्यांना सांगून ताण निवळण्याचा प्रयत्न करतो. वाचनाचा व लिहिण्याचा माेह कधीही सुटू दिला नाही. छंदामुळे विविध विषयांच्या ज्ञानात भर पडते.
- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.
.........
मिमिक्रीचा छंद एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून निघणारे शब्द आपण जसेच्या तसेच आणि त्याच आवाजात नक्कल (मिमिक्री) करण्यातून आनंद शोधतो. प्रत्येक माणसाची बोलण्याची शैली, त्याच्या आवाजाचा उतार-चढाव या गोष्टी त्यात येतातच. एखाद्या व्यक्तींचा आवाज काढून त्यातून उदास किंवा थकलेल्या मनाला आनंददायी करण्याचे काम करत असतो.
- नंदकिशोर बोरकर, पोलीस कर्मचारी
........
गायनात रस
भावगीत, भक्तिगीत, सिनेमाचे जुने गाणे किंवा कोणतेही नवीन गाणे मार्केटमध्ये आले तर त्या गाण्याची चाल, मांडणी आणि लय यावर आपण बारकाईने लक्ष घालून ते गाणे गुणगुणत असतो. गाण्यातून तणाव निवळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. वारंवार गात राहिल्याने आपल्याच आवाजात आणखीणच गोडवा येऊ लागतो.
- गणेश लिल्हारे, पोलीस कर्मचारी
........
........................................................................
पाेलीस दलातील कर्मचारी २२१०
स्त्री ४५०
पुरुष १७६०
अधिकारी १२८
स्त्री ८
पुरुष १२०