‘सारथी’ देणार दलालांना सुट्टी
By admin | Published: March 4, 2017 12:12 AM2017-03-04T00:12:42+5:302017-03-04T00:12:42+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना तयार करणे, त्यांचे नुतनीकरण करणे,
सर्व कामे आता आॅनलाईन : चकरा होतील बंद
नरेश रहिले गोंदिया
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना तयार करणे, त्यांचे नुतनीकरण करणे, पत्त्यात बदल करणे, परवाना एकत्रीकरण अशा विविध कामांसाठी पायपीट करणाऱ्या नागरिकांचा आता त्रास वाचणार आहे. घरबसून ही सर्व कामे आॅनलाईन करण्यासाठी ‘सारथी ४.०’ हे नविन व्हर्जन आले असून यातून लोकांचा त्रास कमी होणार आहे. यामुळे आरटीओ कार्यालयात असणाऱ्या दलालांनाही सुट्टी मिळणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत ही सर्व कामे आॅफ लाईन होत होती. लर्निंग व नियमीत परवाना तयार करण्यासाठी लोकांना या कार्यालयाच्या चकरा काढाव्या लागत होत्या. चकरा मारून-मारून थकलेल्या लोकांना दलाल गाठत व त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करून त्यांची कामे करीत असत. आता या दलालांपासून सुटका करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व कामे आॅनलाईन पध्दतीने करण्यासाठी ‘सारथी ४.०’ या व्हर्जन मधून काम केले जाणार आहे. नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करणे, शुल्क जमा करणे, कागदपत्र जमा करणे ही सर्व कामे ग्राहक सेवा केंद्रातून करता येईल.
आपापल्या कामासाठी आरटीओ कार्यालयात येऊन आरडाओरड करणाऱ्यांना आता कायमची मुक्तता मिळणार आहे.
प्रक्रियेची माहिती ग्राहकाला राहील
ग्राहकांनी अर्ज केल्यावर त्यांना आयडी नंबर मिळणार आहे. त्या आयडी नंबर वरून त्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जावर कुठली प्रक्रिया झाली. आता त्यांचे काम कुठ पर्यंत आले याची इत्थंभूत माहिती अर्जदाराला घरी बसून त्या आयडीवरून पाहता येईल. अर्जात त्रुट्या असल्यास ते अर्ज परत पाठवून त्यातील त्रुट्या दुरूस्त करण्याचा सल्ला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी देणार आहेत. त्रुट्या पुर्ण झाल्यावर तो अर्ज पुन्हा या कार्यालयाला पाठविला जाणार आहे.
तीन दिवस होणार त्रास
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांचा कायमचा त्रास कमी करण्यासाठी हे सिस्टम बसविले जात असल्याने ७, ८ व ९ मार्च रोजी ग्राहकांना थोडा त्रास होणार आहे. या तीन दिवशी काम होणार आहेत. परंतु काम संथ गतीने होणार असल्याची माहिती देण्यात आली. यासाठी गोंदियातील आठ ड्रायव्हींग स्कूलच्या संचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.