शाळांना ४५ मिनिटे आधी सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 10:13 PM2018-04-01T22:13:36+5:302018-04-01T22:13:36+5:30
चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत घेतली जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत घेतली जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली होती. त्यासाठी २० मार्च रोजी एक पत्र काढून सकाळी ७.१५ वाजतापासून दुपारी १२.१५ वाजता पर्यंत सकाळपाळीच्या शाळा ठेवण्यास सांगितले होते. परंतु यावर लोकमतने २४ मार्च रोजी ‘ भर उन्हात सुटणार शाळा’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केल्याने शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी खळबळून जागे झाले. यावर गांभीर्याने विचार करून शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या वेळेच्या ४५ मिनीटांपूर्वी म्हणजे ११.३० वाजता शाळा सुटणार असे दुसरे पत्र ३० तारखेला काढले.
जिल्हा परिषदेच्या १०६५ शाळांत दोन लाखांवर विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. जिल्ह्याचे तापमान ४२ अंशाच्या घरात गेल्याने विद्यार्थ्यांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. दरवर्षीपेक्षा तब्बल १ तास ४५ मिनीटे विद्यार्थ्यांना जास्त वेळ शाळेत राहावे लागेल, असे पत्र होते. परंतु या निर्णयावर सर्वांकडून जोरदार चर्चा झाल्याने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ही वेळ ३० मार्च रोजी बदलवून सकाळी ७.१५ वाजता ते ११.३० वाजता करण्यात आली आहे. लोकमतने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आता भर उन्हाचे चटके खावे लागणार नाही.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीच पाऊण तासाची वाढ
प्रगत शैक्षणिक महाराष्टÑाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना पाच तास मिळावे ही बाब लक्षात घेत सकाळी ७.१५ ते १२.१५ वाजता दरम्यान शाळा करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये यासाठी पाच तास वेळ ठेवण्यात आली. परंतु त्यांना घरी जाण्यास भर उन्हात शाळेतून बाहेर पडावे लागेल या बाबीचा विचार झाला नव्हता. त्यामुळे आता जुनीच वेळ करण्यात आली आहे.