गोंदिया आगारातील चालक-वाहकांना सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 05:00 AM2020-07-24T05:00:00+5:302020-07-24T05:00:36+5:30
कोरोनाने अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली आहे. विशेष म्हणजे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी कोरोना हे एक शाप ठरत असून कोरोनाने कित्येक उद्योगधंदे चौपट केले. कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. विशेष म्हणजे, शासकीय नियंत्रणात येत असलेल्या काही क्षेत्रांत कर्मचारी कपात करणे शक्य नसल्याने आता त्यांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर राज्य परिवहन महामंडळाला जिल्हातंर्गत बस फेºया सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार, बस फेऱ्या सुरू असूनही प्रतिसाद नसल्याने गोंदिया आगारात फेऱ्या कमी व कर्मचारी जास्त असे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी आता कर्मचाऱ्यांना सुटी दिली जात असून आगारातील २७ चालक व २३ वाहकांना सुटीवर पाठविण्यात आले आहे.
कोरोनाने अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेची कंबर मोडली आहे. विशेष म्हणजे, भारतासारख्या विकसनशील देशासाठी कोरोना हे एक शाप ठरत असून कोरोनाने कित्येक उद्योगधंदे चौपट केले. कित्येकांच्या हातचा रोजगार हिरावला आहे. विशेष म्हणजे, शासकीय नियंत्रणात येत असलेल्या काही क्षेत्रांत कर्मचारी कपात करणे शक्य नसल्याने आता त्यांना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसाच काहीसा प्रकार गोंदिया आगारातही दिसून येत आहे. लॉकडाऊनमधील शिथिलतेनंतर राज्य शासनाने परिवहन महामंडळाला जिल्हांतर्गत बस फेºया सुरू करण्यास परवानगी दिली.
मात्र आगारातील आजची स्थिती बघता फेऱ्या कमी व कर्मचारी जास्त असे दिसून येत आहे. आजघडीला गोंदिया आगारात १०९ चालक, ९५ वाहक व २४ चालक-वाहक आहेत. १५ बसेस फक्त ५८ फेऱ्या मारत आहेत. म्हणजेच, १५ चालक व १५ वाहकांचे काम असताना उर्वरित चालक-वाहकांसाठी काही कामच नाही.
परिणामी आता त्यांना सुटी दिली जात आहे. त्यानुसार, गोंदिया आगारात सध्या २७ चालक व २३ वाहकांना सुटी देण्यात आली आहे. १५ तारखेपासून आता हा प्रयोग केला जात आहे.
जेमतेम डिझेलचा खर्च
राज्य शासनाने परिवहन महामंडळाला जिल्ह्यांतर्गत बस फेऱ्या सुरू करण्यास मे महिन्यात परवानगी दिली. त्यानुसार, गोंदिया आगाराने जिल्हांतर्गत बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात ५८ फेऱ्या सुरू आहेत. मात्र कोरोनाच्या धास्तीने नागरिक बसने प्रवास करणे टाळत असल्याने फेऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद नाही. परिणामी जेमतेम डिजेलचा खर्च निघत असून कित्येकदा तोही निघत नसल्याची परिस्थिती आहे.