घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 05:00 AM2022-05-30T05:00:00+5:302022-05-30T05:00:07+5:30
मागील काही दिवसांत तिरोडा परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्यामुळे परिसरात सक्रिय टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व पोलीस टोळीच्या मागे महिन्याभरापासून लागले होते. या टोळीचे सदस्य फकीर टोली काचेवानी येथील समजले असता, त्यानुसार पोलिसांनी जनतेला सतर्क करून त्या भागात जास्त लक्ष केंद्रित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : गोंदिया, बालाघाट, भंडारा व नागपूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे सतत गुन्हे करणाऱ्या टोळीला तिरोडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत चोरी केलेल्या २ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीकडून परिसरातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांत तिरोडा परिसरात मोटरसायकल चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली होती. त्यामुळे परिसरात सक्रिय टोळी फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती व पोलीस टोळीच्या मागे महिन्याभरापासून लागले होते. या टोळीचे सदस्य फकीर टोली काचेवानी येथील समजले असता, त्यानुसार पोलिसांनी जनतेला सतर्क करून त्या भागात जास्त लक्ष केंद्रित केले आहे. अशात शनिवारी (दि.२८) संतोष चंदनलाल हरिणखेडे (२६,रा.मजितपूर) यांची मोटरसायकल फकीरटोली-काचेवानी येथे रस्त्याच्या कडेला उभी करून शौचास गेला असता, चोरी गेल्याची माहिती फोनद्वारे मिळाली.
त्यानुसार उप-विभागीय पोलीस अधीकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, हवालदार मुकेश थेर, बावने, नायक पोलीस शिपाई रक्षे, सवालाखे, प्रशांत कहलकर, चालक शिपाई शेख, चोपकर, दमाहे यांनी त्या भागात लोकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. अशात शेतात खोलगट भागात झाडाखाली ४ व्यक्ती मोटरसायकलच्या नंबर प्लेटमध्ये खाडाखोड करताना दिसले असता, त्यांना घेराव करून पकडण्यात आले. अजय ताराचंद कनोजे (२८,रा. बिरसी), गोलू इसूपखा पठाण (३), अनिल भट्टीलाल कुंभरे (३०) व रोशन प्यारेलाल राऊत (३५, सर्व रा. फकीरटोली-काचेवानी) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे.
त्यांच्या जवळून मोटारसायकल क्रमांक एमएच ४0-एव्ही ०८५३ किंमत ४० हजार रुपये व मोटारसायकल क्रमांक एमएच ४९-एएक्स ६४७९ किंमत ७० हजार रुपये असा एकूण एक लाख २० रुपयांचा मुद्धेमाल मिळून आलेला आहे. आरोपी अजय कनोजे हा मोटरसायकल चोरी व घरफोडीचे गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आहे.
त्यांनी गोंदिया, बालाघाट, भंडारा, नागपूर या जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. या टोळीकडून तिरोडा परिसरातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.