लाभार्थ्यांपर्यंत पोहाेचण्यासाठी ‘ गृहभेट आपुलकीची ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:27 AM2021-04-11T04:27:55+5:302021-04-11T04:27:55+5:30
इसापूर : अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘गृहभेट आपुलकीची’ या संकल्पनेतून जानेवारी ते मार्च दरम्यान तहसीलदार ...
इसापूर : अर्जुनी-मोरगाव तहसील कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ‘गृहभेट आपुलकीची’ या संकल्पनेतून जानेवारी ते मार्च दरम्यान तहसीलदार विनोद मेश्राम आणि संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांनी गावागावात भेट देऊन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध योजनांचे ४४९ अर्ज लाभार्थ्यांकडून भरून घेतले.
यात संजय गांधी निराधार योजना ४२, श्रावण बाळ सेवा योजना १३४, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना १४६, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना ६९, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना ०६, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ५२ असे एकूण ४४९ लाभार्थ्यांकडून प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन अर्ज भरून घेण्यात आले. त्यापैकी ४३० लाभार्थ्यांचे अर्ज तत्काळ मंजूर करण्यात येऊन त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. तर पात्र नसल्याने १९ लाभार्थीचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात संजय गांधी योजना अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहू नये. यासाठी ‘ गृहभेट आपुलकीची ’ या उपक्रमांतर्गत गावागावात जाऊन लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे अशी माहिती तहसीलदार मेश्राम यांनी दिली. या उपक्रमाला नायब तहसीलदार वाढई, अव्वल कारकून रिता गजभिये, तागडे यांचे सहकार्य लाभले. तहसील कार्यालयाच्या ‘गृहभेट आपुलकीची’ या उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर या उपक्रमाबाबत लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयाचे आभार मानले आहे.