गृहभेट आपुलकीची मोहीम आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:23 AM2021-05-03T04:23:33+5:302021-05-03T04:23:33+5:30
बोंडगावदेवी : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जावा, ...
बोंडगावदेवी : शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जावा, यासाठी जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून गृहभेट आपुलकीची मोहीम राबविण्यात येत आहे. तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ३ ते ८ मेपर्यंत गावपातळीवर शासन आपल्या दारी या अभिनव उपक्रमांतर्गत गावातच अर्ज स्वीकारून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
गावातील गरजू, अनाथ, विधवा, राष्ट्रीय वृध्दापकाळ, वयोवृध्दांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सामाजिक अर्थसहाय्य योजनांतर्गत दरमहा एक हजार रुपये आजघडीला आर्थिक सहाय्य केले जाते. या योजनेमुळे लाभार्थ्यांना एक आर्थिक आधार मिळतो. सामाजिक अर्थसहाय्य अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्यनिवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य केले जाते. ग्रामीण भागातील सामान्य जनता योग्य मार्गदर्शन, माहितीच्या अभावी शासनाच्या योजनांपासून वंचित राहतात. ते वंचित राहू नयेत, यासाठी गृहभेट आपुलकीची मोहीम तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या स्तरावरून तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. ३ मे रोजी निमगाव, नवेगावबांध, झाशीनगर, केशोरी, कोरंभीटोला, ४ मे बोंडगावदेवी, पिंपळगाव, धाबेपवनी, भिवखिडकी, महागाव, ५ मे पांढरवाणी, बाराभाटी, सिलेझरी, सिरेगावबाध, चान्ना बाक्टी, ६ मे परसटोला, अर्जुनी मोरगाव, धाबेटेकडी, देवलगाव, इटखेडा, ७ मे वडेगाव / रेल्वे, माहुरकुडा, मोरगाव, इळदा, खामखुर्रा, ८ मे झरपडा, भरनोली, गोठणगाव, चिचोली येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
.............
मंगळवारी (दि. ४) ग्रामपंचायत कार्यालय, बोंडगावदेवी येथे तालुकास्तरीय पथक येऊन निराधार, विधवा, वृध्दापकाळ वयोगटातील लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. गावातील गरजूंनी आवश्यक कागदपत्रांसह मंगळवारी उपस्थित राहून आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा.
- प्रतिमा आनंदराव बोरकर, सरपंच, ग्रामपंचायत, बोंडगावदेवी