इन्स्टाग्रामवर मैत्री करणे पडले महागात; नग्न व्हिडीओ तयार करून उकळले दाेन लाख २२ हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:54 PM2023-10-05T16:54:51+5:302023-10-05T17:00:30+5:30
व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी : हनी ट्रॅप लावून पैसे उकळण्याचा प्रकार जोरात
गोंदिया : सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची, पुढे मधाळ संवादातून अश्लील व्हिडीओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच याच व्हिडीओच्या आधारे खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीने गोंदियातील एका व्यक्तीला तब्बल दाेन लाख २२ हजार ६०० रुपयांनी लुटले. आपल्याला वारंवार सेक्सटॉर्शन होत असल्याचे पाहून त्याने गोंदिया शहर पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार केली.
गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीतील एका फिर्यादीचे नग्न फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत दाेन लाख २२ हजार ६०० रुपये उकळले. १२ सप्टेंबर २०२३ रोजी आय अमनिता कुमारी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिर्यादीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. १३ सप्टेंबर रोजी ती फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करण्यात आली. त्या दोघांची चॅटिंग सुरू झाली. त्या एकमेकांनी चॅटिंग करताना आपापला मोबाइल नंबर दिला. १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ते ११ वाजता दरम्यान तुम्हाला माझ्याशी व्हाॅट्सॲपवर एन्जॉय करायला आवडेल का, असे ती महिला बोलली. तिच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने होकार दिला.
दोघांनी नग्न होऊन व्हिडीओ तयार केला. कॉल संपतात तिने फोन करून ३६ हजार ९०० रुपये रक्कम पाठवून दे नाहीतर मी आपल्या दोघांचा कपडे काढलेल्या व्हिडीओ यू ट्युबवर व्हायरल करीन, अशी धमकी दिली; परंतु, फिर्यादीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा १६ सप्टेंबर रोजी राम पांडे नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून ३६ हजार ९०० रुपयांची मागणी केली, अन्यथा त्या महिलेसोबत तुझ्या काढलेल्या नग्न व्हिडीओ यू ट्युबवर व्हायरल करीन, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरून फोन पे वर ३६ हजार ९०० रुपये पाठवले; परंतु, राम पांडे याने वारंवार फोन करून चार वेळा एक लाख ४७ हजार ६०० रुपये उकळले. राम पांडे याने १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता पुन्हा फोन करून पैशांची मागणी केली १८, २० व २२ या तीन दिवसात २५ हजारप्रमाणे ७५ हजार रुपये पुन्हा उकळले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपीवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०,५०७, ३४ सहकलम माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ डी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी करीत आहेत.
एका मिनिटाच्या व्हिडीओची किंमत मोजली २.२२ लाख
एका मिनिटाची नग्न व्हिडीओ तयार करून फोन कट करून क्षणार्धात धमकी देण्यात आली. ३६ हजार ९०० प्रमाणे चार वेळात एक लाख ४७ हजार ६०० रुपये मागितले तर २५ हजारप्रमाणे तीन वेळा ७५ हजार रुपये मागितले. १४ ते २२ सप्टेंबर या नऊ दिवसांत दाेन लाख २२ हजार ६०० रुपये मोजून हताश झालेल्या फिर्यादीने पोलिसात तक्रार केली.
ट्युबवर व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी
दोघांचा नग्न व्हिडीओ यू ट्युबवर व्हायरल करीन, अशी धमकी देत त्या महिलेने व तिच्या मदतीला असलेल्या पुरुषाने सेक्सटॉर्शन करून पैसे उकळले. सन २०२१ या वर्षात सेक्सटॉर्शनप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला. हनी ट्रॅप लावून पैसे उकळण्याच्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. गोंदियातही पाय रोवण्याचा प्रयत्न झाला आहे.
फसवणूक करणाऱ्या टोळ्या गोंदियातही
या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी उत्तीर्ण मुलांना घेतले जाते. त्यांना हे गुन्हे करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानुसार ही टोळी एखाद्या सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळते. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणातील टोळ्या तयार झाल्या आहेत. हनी ट्रॅप लावून पैसे उकळण्याच्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. अशा टोळ्या गोंदियातही आहेत.
काय काळजी घ्याल?
- अशा घटनांपासून सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची सेटिंग प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.
- त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका.