मराठीचा अधिकाधिक वापर हाच मातृभाषेचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:26 AM2018-03-04T00:26:47+5:302018-03-04T00:26:47+5:30
महाराष्ट्रात आपण बोलण्यात व लिहिण्यात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावयास पाहिजे. मराठी ही दर्जेदार भाषा असून शब्दांचा खजीना अफाट आहे.
ऑनलाईन लोकमत
तिरोडा : महाराष्ट्रात आपण बोलण्यात व लिहिण्यात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावयास पाहिजे. मराठी ही दर्जेदार भाषा असून शब्दांचा खजीना अफाट आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अधिकाधिक वापर हाच मातृभाषेचा सन्मान असल्याचे प्रतिपादन प्रा.भास्कर गायकवाड यांनी व्यक्त केले.
येथील बस आगारात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आभार व्यवस्थापक के.सी.चोपकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नितिन आगाशे, निळकंठ साकुरे, रमाकांत खोब्रागडे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. गायकवाड यांनी, देशाच्या इतर राज्यातील लोकांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान आहे. ते आपल्या बोलण्यात कन्नड, तामिळी, पंजाबी, हरयाणवी, आसामी, बंगाली आदी भाषांचा वापर करतात. त्या राज्याची शासकीय व्यवहाराची भाषा देखील तेथील मातृभाषाच असते. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी बोलणारे सुद्धा हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर अधिक करताना दिसतात. संत ज्ञानेश्वरांपासून अनेक मोठमोठ्या साहित्यीकांनी मराठी भाषा फुलवली आहे. आपल्या मातृभाषेचा वापर आपल्या व्यवहारात व बोलण्यात अधिकाधिक करावा असे आवाहन केले.
याप्रसंगी चोपकर यांनी, महाराष्ट्रातील इतर शासकीय कार्यालयांचा व्यवहार प्रामुख्याने इंग्रजीत चालतो. मात्र केवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळ असे आहे की, येथे फक्त मराठीतूनच व्यवहार केला जातो. अस सांगीतले.
कार्यक्रमाला बसस्थानक प्रमुख टेकाम, दिलीप बंसोड, अमित उरकुडे, सातके पटले उपस्थित होते. संचालन बडोले यांनी केले. आभार आगाशे यांनी मानले.