भरनोली एओपीकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By admin | Published: July 29, 2015 01:28 AM2015-07-29T01:28:44+5:302015-07-29T01:28:44+5:30
आदिवासी भागातील विद्यार्थी संदीप भुमेश्वर ताराम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. त्याची निवड पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झाली आहे.
केशोरी : आदिवासी भागातील विद्यार्थी संदीप भुमेश्वर ताराम याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. त्याची निवड पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झाली आहे. त्याबद्दल पोलीस ठाणे केशोरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस सशस्त्र दूरक्षेत्र कॅम्प भरनोली व दीपस्तंभ वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप ताराम तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार एओपी भरनोलीच्या प्रांगणात रविवारी करण्यात आला.
अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक वाघचौरे होते. अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, ठाणेदार बंडगर, पोलीस उपनिरीक्षक एसआरपी डावरे, भरनोलीचे एओपी खरड उपस्थित होते.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नक्षल प्रभावित भरनोली येथे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन एओपी प्रभारी पोलीस उपनिरीक्षक बसराज चिट्टे यांनी एका वर्षापूर्वी दीपस्तंभ वाचनालयाची निर्मिती केली. तेथे तरूणांसाठी एमपीएससी, यूपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू केले. त्यामुळे आदिवासी भागातील भरनोली या लहानशा खेड्यात जन्मलेला संदीप भुमेश्वर ताराम या तरूणाने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. आता त्याची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल विभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच परिसरातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त शिल्पा शहारे, टीना टेंभुर्णे, ज्योत्स्रा झोळे, आकाश कापगते, मेघा मेश्राम या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच कर्तव्य तत्पर अधिकारी म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाने जिल्ह्यात परिचित असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांची गोंदिया जिल्ह्यातून मालेगाव येथे बदली झाल्यामुळे एओपी भरनोली व पोलीस ठाणे केशोरीकडून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात गजानन राजमाने म्हणाले, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोण अभ्यासाकडे वाटचाल करावी. त्यासाठी नियमित वाचन करत रहावे. अभ्यासाच्या सातत्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकेल. प्रत्येकाने आपले ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे ते म्हणाले.
ठाणेदार बंडगर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत, नक्षल प्रभावित व आदिवासीबहुल भागासाठी पोलीस विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमात परिसरातील नागरिक तसेच सर्व शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भरनोली एओपी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)