चावडीवरच्या शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:10+5:302021-09-06T04:33:10+5:30
चिंचगड : वांढरा येथील राम पहाडी, श्रीराम चौक, चावडीवरील शाळेत बालकांना शिकविण्याचे कार्य सुरू असतानाच या कार्याला पुढे नेत ...
चिंचगड : वांढरा येथील राम पहाडी, श्रीराम चौक, चावडीवरील शाळेत बालकांना शिकविण्याचे कार्य सुरू असतानाच या कार्याला पुढे नेत या चावडीवरच्या शाळेत परिसरातील वर्ग १० आणि १२ वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोनाकाळात शाळेच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आणि मनावर निराशेची झालर ओढलेल्या बालकांना वांढरा येथील राम पहाडी, श्रीराम चौक, चावडीवर दरदिवशी सकाळी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील गृहपाल किशोर देशकर सपत्नीक आपले मित्र नरेश नेवारे, संतोष बनकर, योगेश देशमुख आणि सुशील देशमुख यांच्या खेळ, व्यायाम, गप्पागोष्टी, थोरपुरुषांचे चरित्र सांगणे, स्वच्छता अभियान, बालक व्यसनमुक्ती अभियान, पक्ष्यांसाठी दाणा आणि पाण्याची व्यवस्था, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड यासोबतच शैक्षणिक मार्गदर्शन करत असताना नजरेत पडत आहेत. यात वांढरा, डोंगरगाव आणि सुंदरी गावातील बरीच चिमुकली चिमणी पाखरे या प्रवाहात सामील झालेली आहेत.
यातच त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत फक्त भेटवस्तूच न देता त्यांना निरनिराळ्या वृक्षांची रोपटी बक्षीस म्हणून दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्याच हातून परिसरात लावत यातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा समाजाला संदेश देण्यात आला. सोबतच ज्यांनी श्रीराम मंदिर संस्थानसाठी अविरत सेवा केली, अशा समाजसेवी, नि:स्वार्थी भावना असणारे मंदिर समिती सचिव कृष्णा देशमुख व संतोष बनकर यांना स्वच्छतादूत म्हणून आणि मंदिर पुजारी नामदेव फिटिंग यांचाही शाल व श्रीफळ तसेच रोपटी देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी छत्रपती प्रतिष्ठानचे महेश रहांगडाले, प्राचार्य राकेश सहारे, विनोद तेजनकर, भालचंद्र खंडाईत, भावना देशमुख, हेमलता देशमुख, श्वेता मुलकलवार, कविता देशमुख, लक्ष्मण सोनसर्वे, भारत सोनटक्के, मुख्याध्यापक तुंबराज भोयर, रोशन टेंभर्णे, बंटी अजमेरा, आर.बी. भीमटे, वामन देशमुख, जयेंद्र चाकाटे, अशोक सहारे व पोलीस पाटील उपस्थित होते. संचालन किशोर सहारे यांनी केले. आभार योगेश देशमुख यांनी मानले.