पीठ गिरणीतून ‘आशा’ने दूर केली ‘निराशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:26 AM2017-12-15T01:26:25+5:302017-12-15T01:27:07+5:30
तिरोडा तालुक्याच्या घोगरा येथील तुटपुंज्या शेतीत उदरनिर्वाह करणाºया आशा भांडारकर ह्या गावातील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यांनी गटातून कर्ज घेवून पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबातील आर्थिक निराशा दूर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या घोगरा येथील तुटपुंज्या शेतीत उदरनिर्वाह करणाºया आशा भांडारकर ह्या गावातील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यांनी गटातून कर्ज घेवून पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करून आपल्या कुटुंबातील आर्थिक निराशा दूर केली. घोगरा येथून दोन किमी अंतरावर मुंडीकोटा येथे दळण दळण्याकरिता ग्रामस्थांची होणारी पायपीट दूर झाली.
जेव्हा घोगरा गावात गटबांधणीला सुरूवात झाली तेव्हा आशा यांनीसुद्धा गटात प्रवेश केला. गटाच्या बैठकीत सहयोगीनीने कर्ज घेवून व्यवसाय थाटून कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रवृत्त केले. तेव्हा काही महिलांनी कर्जाची मागणी केली. गावामध्ये एकही पीठ गिरणी नव्हती. त्यामुळे महिलांना, घरच्या मंडळींना दळण दळण्यासाठी दोन किमी अंतरावरील मुंडीकोटा येथे जावे लागत होते. महिलांना त्रास होवू नये, या हेतूने आशाने पीठ गिरणीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. घरातील कामे सोडून दळण दळण्यासाठी शेजारच्या गावात जावे लागते. त्यामुळे गटाच्या बैठकीत पीठ गिरणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) सहकार्याने महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करुन दिला. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे माविमला सहकार्य असल्याने तेथे प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. त्यानुसार प्रक्रिया केल्यावर प्रगती महिला बचत गटाला बँकेकडून एक लाख २० हजार रूपयांचे कर्ज मिळाले.
आशा भांडारकर यांनी ते कर्ज घेवून मोठी पीठ गिरणी सुरू केली. तसेच मिळणाºया पैशातून हप्ते चुकविले. उत्पन्नात भरपूर वाढ झाली. त्यामुळे आता त्यांना पैशाची अडचण जाणवत नाही. त्यांना दोन मुले असून त्यांना सोबतील घेवून सदर काम सांभाळतात. आता त्यांना त्यांच्या जनावरांकडे नीट लक्ष देता येते. रोजंदारीवर न जाता घरात मानाने काम करून पैसे मिळविण्याचा मार्ग सापडला. हा फायदा किरकोळ वाटत असला तरी दुर्लक्ष करण्यासारखे नाही. हे अनेक महिलांना पटले आहे. केवळ बचत गट, ग्रामसंस्थेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात भर पडली व त्या स्वत:च्या पायावर उभे झाल्या.
आर्थिक व वैयक्तिक अडचणी सोडविण्यास मदत
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत घोगरा येथे कौशल्य ग्रामसंस्था आहे.पशुपालन हा गावातील मुख्य व्यवसाय आहेत. गावात एकूण १३ स्वयंसहायता महिला बचत गट आहेत. त्यापैकी प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या आशा मधुकर भांडारकर सदस्य आहेत. आता या गटातील सर्व महिला मिळून सीआपी यांच्या सहकार्याने गटाच्या नियमित बैठका घेतात.