कोरोनावर मात करणाऱ्यांची घोडदौड सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:24 AM2021-05-03T04:24:05+5:302021-05-03T04:24:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे सारेच हैराण आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यात मागील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सर्वत्र कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे सारेच हैराण आहेत. मात्र, गोंदिया जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कोरोनावर मात करणाऱ्यांची घोडदौड सुरुच असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मागील आठ दिवसांच्या कालावधीत सात हजारांवर बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी ६६२ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली तर ५७२ नवीन रुग्णांची नोंद झाली. पाच रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी आणि शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. रविवारी आढळलेल्या ५७२ रुग्णांमध्ये सर्वाधिक २४७ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २७, गोरेगाव ६४, आमगाव ३७, सालेकसा ०४, देवरी ८१, सडक अर्जुनी ९४, अर्जुनी मोरगाव १२ आणि जिल्ह्याबाहेरील ६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १,३५,३३२ जणांचे स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १,०९,८५१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचणी केली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत १,३८,०१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,०९,२३० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३४,१६५ बाधित आढळले असून, यापैकी २८,२१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ५,४०० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४,६८१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
...........
१ लाख ६३ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. या अंतर्गत १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६३ हजार ४८८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. एकूण १४० केंद्रांवरुन ही प्रक्रिया सुरु आहे तर १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यात शनिवारपासून पाच केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
.