किंडगीपार रेल्वे उड्डाणपुलाचे घोडे अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 09:10 PM2019-05-10T21:10:30+5:302019-05-10T21:11:07+5:30
जिल्ह्यातील रस्ते वाहतूक गतिमान असताना जलद रस्ते मार्गांना रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा निर्माण होत आहे. किंडगीपार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या मागणीसह अनेक ठिकाणी असलेल्या क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : जिल्ह्यातील रस्ते वाहतूक गतिमान असताना जलद रस्ते मार्गांना रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा निर्माण होत आहे. किंडगीपार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या मागणीसह अनेक ठिकाणी असलेल्या क्रॉसिंगवर उड्डाण पुलाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून अद्यापही त्यावर कुठलाच विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या प्रस्तावाची फाईल धूळ खात पडली आहे.
आमगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भाग रेल्वे मार्गाने जोडला आहे. या रेल्वे मार्गावर गतिमान असलेली वाहतूक मात्र क्रॉसिंग गेटच्या नियमित थांब्यामुळे रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. आमगाव देवरी मार्गावरील बाम्हणी गेट, किंडगीपार गेट, जवरी मार्ग यावर रेल्वे महमार्गाचे जाळे पसरले आहे. दररोज रेल्वे मार्गात प्रवासी वाहतुकीसह औद्योगिक माल वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे रेल्वे मार्ग अतिव्यस्ततेचे झाले आहे. यात राष्ट्रीय रस्ते महामार्गावरील वाहतुकीला मात्र थांबा मिळत आहे. राष्ट्रीय रस्ते महामार्गावर असलेल्या रेल्वे मार्गाची रेल्वे क्रॉसिंग वाहतुकीला डोकेदुखी ठरत आहे. आमगाव येथे बाजारपेठ आहे. शहराला जोडणारा रस्ते महामार्ग मध्यप्रदेश व छत्तीसगड या राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा केंद्र बिंदू आहे. औद्योगिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळविण्यासाठी या महामार्गाचा अवलंब केला जातो. परंतु प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी रस्ते महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा ठरत आहे. रेल्वे मार्गावरील वाहतूक अधिक असल्याने वारंवार रेल्वे क्रॉसिंगवरील गेट बंद होते. किमान २५ ते ३० मिनिटापर्यंत या मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प होते. रेल्वे मार्गावरील क्रॉसिंगमुळे रस्ते मार्गावरील औद्योगिक, प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.
रस्ते महामार्गावर रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा कायम सुटावा यासाठी उड्डाणपुलाची मागणी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली. मात्र या प्रस्तावाला राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाची मंजुरी न मिळाल्याने ब्रेक लागल्याची माहिती आहे.
रेल्वेचा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडे
शहरातील बाम्हणी व किंडगीपार रस्ते महामार्गावरील रेल्वे वाहतुक क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडे पाठविण्यात आला आहे. रेल्वे विभागाने प्राधान्यक्रमाने उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी प्रस्तावाला हिरवा कंदिल दाखविला आहे. याला राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजुरी देऊन वाहतूक गतिमान करावी, असे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रस्तावावर अनेकदा चर्चा
रेल्वे उड्डाणपुलासह प्रवासी वाहतूक गाड्या आमगाव-डोंगरगड-गोंदिया या मार्गावर उपलब्ध व्हावी. यासाठी रेल्वे विभागाकडे पत्र व्यवहार सुरु आहे. अनेकदा रेल्वे विभागातील बैठकांमध्ये यासंबंधिचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. नागपूर रेल्वे विभागाने प्रस्ताव केंद्रीय रेल्वे विभागाला सादर केले आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होईल, अशी आशा डीआरयुसीटी सदस्य घनशाम अग्रवाल यांनी व्यक्त केली.
तीन टप्प्यात होणार काम
आमगाव येथील रस्ते मार्गावरील बाम्हणी व किंडगीपार रेल्वे उड्डाणपुलाच्या मागणीचा प्रस्ताव राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाला सादर करण्यात आला आहे. यात पहिल्या टप्यातील देवरी-आमगाव रस्ते मार्गाचे बांधकामाला मंजुरी मिळून कार्य प्रगतीवर आहे. यात बाम्हणी रेल्वे क्रॉसिंग गेट वरील उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील आमगाव-गोंदिया बायपास रस्ते मार्ग बांधकामाचा प्रस्ताव मंजुरीकरिता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सादर करण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती खा.अशोक नेते यांनी लोकमतशी बोलताना दिली.