रुग्णालयात बेड रिकामे नाही खासगी रुग्णालयात जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:43+5:30
जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्हाभरातून आणि लगतच्या मध्यप्रदेशातील महिला रुग्ण आणि प्रसूतीसाठी महिलांना दाखल केले जाते. गोरगरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आर्थिक भूर्दंड बसू नये यासाठी शासनाने बाई गंगाबाई महिला रुग्णालयात त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सर्र्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासकीय रुग्णालयातील रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुग्णालयाचे २० टक्के बेड कोविडसाठी राखीव असलल्याचे सांगून रुग्णालयात प्रसूती येणाऱ्या गोरगरीब महिलांना तेथे कार्यरत डॉक्टर खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे गोरगरीबांना खासगी रुग्णालयाची वाट पकडून उधारउसनवारी करुन उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र येथील एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात सध्या पाहयला मिळत आहे.
जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात जिल्हाभरातून आणि लगतच्या मध्यप्रदेशातील महिला रुग्ण आणि प्रसूतीसाठी महिलांना दाखल केले जाते. गोरगरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात, त्यांना आर्थिक भूर्दंड बसू नये यासाठी शासनाने बाई गंगाबाई महिला रुग्णालयात त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहे. यासाठी शासनाने लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र ज्यांच्यासाठी हा खर्च केला जातो त्यांनाच आरोग्यविषयक सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचा प्रकार सोमवारी (दि.२९) या रुग्णालयात पुढे आला. गोंदिया तालुक्यातील फुलचूरपेठ येथील कोमल बागडकर या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने तिला तिच्या पत्नीने प्रसूतीसाठी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आले.मात्र सुरूवातीला दोन तास येथे कार्यरत डॉक्टरांनी सदर महिलेला दाखल करुन घेतले शिवाय तिच्याकडे लक्ष सुध्दा दिले आहे. त्यामुळे सदर महिलेच्या पत्नीने सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांना फोन लावून रुग्णालयात बोलविले. त्यांनी सुध्दा डॉक्टरांना सदर महिलेला दाखल करुन घेण्याची विनंती केली.मात्र तेथे कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात बेड रिकामे नाही, तुम्ही खासगी रुग्णालयात जा असा सल्ला देत त्यांना परतावून लावले. बागडकर यांचे पती मोलमजूरी करुन जीवन जगतात, त्यामुळे त्यांच्याकडे खासगी रुग्णालयात जावून उपचार घेण्यासाठी पैसे नव्हते. आपल्या परिस्थितीची जाणीव करुन देत त्यांनी डॉक्टरांना विनवनी केली.मात्र तेथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांचे ऐकून न घेतल्याने अखेर त्यांना खासगी रुग्णालयाची वाट पकडावी लागली. खासगी रुग्णालयात पत्नीला प्रसूतीसाठी दाखल करावे लागले. मोलमजुरी करणाऱ्यांकडे जर खासगी रुग्णालयात जावून उपचार घेण्यासाठी पैसे असते तर ते कशाला शासकीय रुग्णालयात गेले असते असा सवाल देखील बागडकर यांच्या पतीने केला. बाई गंगाबाई महिला रुग्णालयात तेव्हा कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांची विनंती सुध्दा ऐकूण न घेतल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला.
बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील हा पहिलाच प्रकार नसून यापूर्वी देखील असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहे. लोकमत कार्यालयात सुध्दा दर एक दिवसाआड एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाचा यासाठी फोन येतो. यासंदर्भात अनेकदा लक्ष सुध्दा वेधण्यात आले. मात्र यानंतरही रुग्णालयाच्या व्यवस्थेत कुठलीच सुधारणा झाली नसून समस्या कायम आहे.
कोणत्या रुग्णालयात जायचे याचाही सल्ला
बाई गंगाबाई महिला रुग्णालय नेहमीच कुठल्या तरी कारणावरुन चर्चेत असते. मागील चार पाच दिवसांपासून या रूग्णालयात कोविडसाठी बेड राखीव असल्याचे सांगून गोरगरिब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे कोणत्या खासगी रुग्णालयात जायचे त्या रुग्णालयाचे नाव सुध्दा येथील कर्मचारीच सांगतात. त्यामुळे या रुग्णालयात नेमके चाललय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रुग्णालयात १२० बेडची क्षमता
जिल्ह्यातील एकमेव महिला रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात १२० बेडची क्षमता आहे.मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने २० टक्के बेड कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव असल्याचे सांगून गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. आरोग्य विभागाने यावर तोडगा काढून अथवा खासगी रुग्णालये अधिगृहीत करुन गोरगरिब रुग्णांची गैरसोय होणार नाही काळजी घेण्याची गरज आहे. मात्र तसे न करता प्रसूतीसाठी येणाºया महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देवून गोरगरिब रुग्णांची खिल्ली उडविली जात आहे.
तक्रारींचा ढिग मात्र कारवाई शुन्य
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारासंदर्भात अनेक तक्रारी आहे.यासाठी वरिष्ठांच्या निर्देशाने चौकशी समिती सुध्दा गठीत करण्यात आली. मात्र कारवाई शुन्य असल्याने चित्र आहे.अनेकदा तक्रारी करुन सुध्दा त्याची दखलच घेतली जात नसल्याने आता नागरिकांनी सुध्दा तक्रारी करणे बंद केले आहे.
बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील २० टक्के बेड सध्या कोविडसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना तेथे कार्यरत डॉक्टरांना दिल्या आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देणे योग्य नसून याची चौकशी करुन संबंधितावर कारवाई केली जाईल.
- डॉ.व्ही.पी.रुखमोडे
अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया.