उष्ण लहरींनी जिल्ह्याला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 08:51 PM2019-04-23T20:51:50+5:302019-04-23T20:52:10+5:30
दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी व गारपिटीने गारवा निर्माण करणारे वातावरण आता चटकन बदलले असून उष्ण लहरींना आता जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. उन्हाळ्याचा हा खरा चटका जिल्हावासीयांना मंगळवारी (दि.२३) अनुभवता आला. हवामान खात्याने २३ ते २६ तारखेपर्यंत उष्णतेच्या तिव्र लाटेचे संकेत दिले असून मंगळवारी त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याचे दिसून आले.
अरबी सागर ते बंगालच्या खाडीपर्यंत गत १० दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वातावरण निर्माण होवून पावसाच्या सरी कोसळल्या. आता दाब कमी होवून वाऱ्याची गती संथ झाली आहे. त्यामुळे वातावरणात प्रतिकूल अशा प्रमाणात दाब निर्माण होवून तापमान वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. अशात विदर्भातील सहा जिल्ह्यात तापमानात वाढ होवून २३ ते २६ तारखेदरम्यान उष्ण लहरी प्रवाहीत होणार असा अंदाज आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या हा अंदाज मंगळवारपासून (दि.२३) असून त्यांचा अंदाज खरा ठरत असल्याची अनुभुती दिसून आली. मंगळवारी सकाळपासूनच रखरखत्या उन्हामुळे वातावरण चांगलेले दिसले.
मागील चार-पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तापमान ३७ ते ३८ डिग्रीच्या घरात तापमान मंगळवारी वाढून ४० च्या घरात गेले होते. शिवाय उष्ण लहरींमुळे उकाडा वाढून अंगाची लाहीलाही होवू लागली होती. मंगळवारपासून सुरू झालेल्या उष्ण लहरींनी पहिल्याच दिवशी रंग दाखविल्याने आणखी दोन दिवसांना घेऊन त्याचा सर्वांना धसकाच बसला आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
उष्ण लहरींमुळे घराच्या आत बसून अंग भाजत असल्याचे वाटत असतानाच या तीन दिवसांत आरोग्याची काळजी घेण्याचे वाहन हवामान व आरोग्य खात्याने केले आहे. या तीन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळणे हा सर्वात रामबाण उपाय आहे. याशिवाय, आरोग्य विभागाकडून उन्हापासून बचावासाठी देण्यात आलेल्या टिप्सचे पालन करणे आता गरजेचे झाले आहे.