रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेलचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 10:37 PM2019-05-13T22:37:31+5:302019-05-13T22:37:56+5:30
वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्ते मोकळे करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी (दि.१३) शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल चालकांचे अतिक्रमण हटविण्यात आले.हॉटेल व्यावसायीकांनी नाली आणि रस्त्यावर बांधलेला ओटे फोडून रस्ते मोकळे करण्यात आले.
शहरातील गोरेलाल चौक, नेहरु प्रतिमा, चांदणी चौक, रेल्वे स्टेशन रोड, दुर्गा चौक, गांधी प्रतिमा या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा व्यवसायीकांनी अतिक्रमण करुन रस्ते अरुंद करुन टाकले आहे. आधीच शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अरुंद असून त्यात अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी अधिकच कमी झाली आहे. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी आणि अपघाताच्या संख्येत वाढ झाली होती. वाहतुकीच्या कोंडी वाढत असताना ती सोडविण्यासाठी उपाय योजना केल्या जात नसल्याने शहरवासीयांमध्ये रोष व्याप्त होता. अखेर याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी घेत शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करुन वाहतुकीसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १० मे पासून वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. दोन दिवसात शहरातील काही भागातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे प्रथमच शहरातील रस्ते किती मोठे याचीे जाणीव शहरवासीयांना झाली. त्यानंतर सोमवारी (दि.१३) रेल्वे स्थानक परिसरात काही हॉटेल व्यावसायीकांनी केलेले अतिक्रमण काढण्यात आले. या अतिक्रमणामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. हॉटेलचे अतिक्रमण काढून रस्ते पूर्णपणे मोकळे करण्यात आले. नाली आणि रस्त्यावर केलेले पक्के अतिक्रमण सुध्दा मजूर लावून फोडण्यात आले.यामुळे अतिक्रमणधारकांची काही वेळ चांगलीच तारांबळ उडाली होती. मोहीमेदरम्यान वाहतूक नियंत्रण विभाग आणि नगर परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण कायम
शहरातील गोरेलाल चौक परिसरात मुख्य बाजारपेठ असून या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात व्यावसायीकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यांची रुंदी फारच कमी झाली असून या ठिकाणी सर्वाधिक वाहतुकीची कोंडी होते. पण अतिक्रमण हटाव पथकाची नजर अद्यापही या परिसराकडे न गेल्याने या भागातील अतिक्रमणाची समस्या कायम आहे.
पक्क्या अतिक्रमणावर चालणार का हातोडा?
शहरातील केवळ मुख्य चौकातच नव्हे तर इतरही भागात काही बड्या व्यक्तींनी पक्के अतिक्रमण केले आहे. नगर परिषदेने हे अतिक्रमण हटविण्याचा दोनदा प्रयत्न केला. मात्र त्यात नगर परिषदेला यश आले नाही. मात्र आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मोहीमेदरम्यान पक्क्या अतिक्रमणावर सुध्दा हातोडा चालणार का? असा सवाल शहरवासीयांकडून केला जात आहे.
मोहीम तीव्र होणार का?
सोमवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र स्वरुपात राबविण्यात येईल असे मोहीमेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. मात्र सोमवारी अतिक्रमण हटाव मोहीमेची गती पाहता त्यात फारशी तीव्रता आढळली नाही. त्यामुळे ही मोहीम खरोखरच तीव्र होणार की आधीच्या मोहीमेसारखीच ती पुन्हा बंद पडणार असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे.