शॉटसर्कीटमुळे घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक
By कपिल केकत | Published: September 27, 2022 01:54 PM2022-09-27T13:54:26+5:302022-09-27T14:01:50+5:30
सिव्हील लाईन्स परिसरातील घटना
गोंदिया : गोरेगाव येथे रविवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली असतानाच शहरातील सिव्हील लाईन्स हनुमान चौक परिसरातील रहिवासी राजेश दोनोडे यांच्या घरात सोमवारी (दि.२६) मध्यरात्री २ वाजतादरम्यान आग लागली. या आगीत त्यांचे घरातील सामान जळून सुमारे ३० हजार रूपयांचे नुकसान झाले.
दोनोडे यांच्या घरातील एका खोलीत आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच दोनोडे यांनी अग्निशमन विभागाला फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत खोलीतील पलंग, पंखे, कपडे, सोफा व अन्य सामान अशाप्रकारे सुमारे ३० हजार रूपयांचे सामान जळून राख झाले होते. पथकाने वेळीच आग आटोक्यात आणली अन्यथा आग पसरून मोठा अनर्थ झाला असता. विशेष म्हणजे, आतापर्यत घडलेल्या आगीच्या घटनांमध्ये शॉटसर्कीट हेच कारण दिसून आले आहे.