कंटेन्मेंट झोनमधील शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:03+5:302021-05-01T04:28:03+5:30
गोंदिया : शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानपीक, मका पीक विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत ...
गोंदिया : शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर रब्बी हंगामातील धानपीक, मका पीक विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या संकटामुळे अनेक गाव कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. त्या गावातील शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाईन कसा करावा हा प्रश्न आहे. या ऑनलाईन सातबाराची मुदत वाढविण्याची मागणी आमगाव तालुक्याच्या बोथली येथील सरपंच राजकुमार चव्हाण व प्रतिष्ठित नागरिक प्रल्हाद वंजारी यांनी तहसीलदार आमगाव व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
सरकारने दिलेल्या कालावधीत अनेकदा ऑनलाईन नोंदणी करण्याची साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेक शेतकरी ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित आहेत. अनेक गावात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने अनेक गाव कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ३० मेपर्यंत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता साईट निर्माण करून १ मे ते ३० जूनपर्यंत चालणाऱ्या धानपीक, मका पीक खरेदीसाठी रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सातबारा, नमुना आठ, बँक पासबुकची झेराॅक्स प्रत अपलोड करून ऑनलाईन नोंदणी ३० एप्रिलपर्यंत करायची होती. परंतु साईट बरोबर चालत नसल्याने अनेक शेतकरी या ऑनलाईन नोंदणी करण्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी तहसीलदारांकडे शेतकऱ्यांनी केली आहे.