कसा शोभला असता भीम माझा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:21 PM2019-04-14T22:21:43+5:302019-04-14T22:22:07+5:30
‘कसा शोभला असता भीम नोटावर...’ या गाण्यावर बेधुंद होत नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने रविवारी शहर दुमदुमून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ‘कसा शोभला असता भीम नोटावर...’ या गाण्यावर बेधुंद होत नाचत असलेल्या तरूणाईने बाबासाहेबांचा जयघोष करीत त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. हजारोंच्या संख्येत सहभागी आंबेडकरी बांधवांच्या रॅलीने रविवारी शहर दुमदुमून गेले असतानाच गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शहरात निघणाऱ्या भव्य रॅलीची शहरातील एक परंपराच आहे. महामानवाला जन्मदिनाची शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्याप्रती आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी शहरात निघणाºया या रॅलीत मोठ्या संख्येत लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत महिला व पुरूष सहभागी होतात. शहरातील प्रत्येक परिसरातील आंबेडकरी समाजबांधव आपापली वेगळी रॅली काढत असतात. यानंतर सर्व रॅली एकत्र आल्याने एक भव्य रॅली तयार होत असून गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेते. शहरातील मुख्य मार्गाने निघत असलेल्या या रॅलीत ढोल-ताशे व डिजेवर धुंद होत नाचत गात आंबेडकरीबांधव बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. यंदाही शहरात भव्य रॅली निघाली व आंबेडकरी बांधवांनी एकच जल्लोष करीत आपला आनंद व्यक्त केला. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ सारख्या गाण्यांवर नाचत तरूणाईने बाबासाहेबांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व रॅलीचा आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला.
‘हॅप्पी बर्थ डे.....’ गाण्याची धूम
बाबासाहेबांवरील सर्वच गाणी तशीही सुपरहीट व लोकप्रिय आहेत. यामुळेच रॅलीत बाबासाहेबांवरील ही गाणी प्रामुख्याने वाजविली जातात. ही गाणी वाजताच आंबेडकरी बांधवांना एक स्फूर्ती मिळते. तोच प्रकार या रॅलीत दिसून आला. ‘कसा शोभला असता भीम नोटावर’ हे गाणे वाजताच त्यावर जल्लोष करीत तरूणाई बेधूंद नाचत असताना दिसली. तर बाबासाहेबांचा जन्मदिवस असल्याने त्यांच्यावरील ‘हॅप्पी बर्थ डे टू यू.....’ या गाण्याचीही रॅलीत एकच धूम होती.
ठिकठिकाणी खाद्य पदार्थांचे वितरण
सकाळपासूनच शहरात निघत असलेल्या या रॅलीत चिमुकल्यांपासून तर वयोवृद्धही सहभागी होतात. नाचत गात आपला आनंद व्यक्त करीत निघालेल्या या आंबेडकरी बांधवांना तहान व भूक लागल्यास इतरत्र जावे लागू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी खाद्य पदार्थ व पेयांचे वितरण केले जाते. विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व काही बांधवांकडून खाजगीस्तरावर ही सर्व व्यवस्था करण्यात येते. त्यानुसार यंदाही रॅलीतील बांधवांसाठी टरबूज, लस्सी, पाणी, सरबत, मिल्कशेक, पुलाव, पोहे, उपमा आदी खाद्य पदार्थांचे वितरण करण्यात आले.