अजून किती दिवस ‘ना घर का, ना घाट का’

By admin | Published: April 11, 2016 02:01 AM2016-04-11T02:01:39+5:302016-04-11T02:01:39+5:30

ग्रामपंचायत, नगर पंचायत किंवा नगर परिषद या त्रिकुटात सापडलेल्या आमगाव नगरीची स्थिती सध्या ‘...

How many days 'no home, no ghat' | अजून किती दिवस ‘ना घर का, ना घाट का’

अजून किती दिवस ‘ना घर का, ना घाट का’

Next

ओ.बी. डोंगरवार
ग्रामपंचायत, नगर पंचायत किंवा नगर परिषद या त्रिकुटात सापडलेल्या आमगाव नगरीची स्थिती सध्या ‘...ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. नगर पंचायत होण्याकरिता ग्रामपंचायत बर्खास्त करण्यात आली. मग नगर पंचायत नको नगर परिषद व्हावी याकरिता न्यायालयात धाव घेण्यात आली. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आमगावचे काय होणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
अनेक राजकीय विश्लेषक विश्लेषण करीत असले तरी पुढे काय होणार हे सांगणे कठीण आहे. चेंडू राज्य सरकारच्या दालनात आहे. नगर परिषद झाली पाहिजे याकरिता काही राजकीय मंडळी आपली बाजू ठेवत आहेत. तर कोणी नगर पंचायत किंवा ग्रामपंचायत बरी या विचारसरणीचे आहेत. विचार, तर्कवितर्क अनेकांचे अनेक असले तरी आज या गावाचा वाली कोण? यावर विचार होणे गरजेचे आहे. आमगाव ते खामगाव जे आपण गर्वाने म्हणत होतो ते आमगाव पोरके झाले आहे.
पहिल्या कार्यालयात ग्रामपंचायत भवन, असा मोठा फलक होता. नगर पंचायत झाल्यानंतर तो फलक मिटवून नगर पंचायत असा उल्लेख करण्यात येऊन फलक सुद्धा लावण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर नगर पंचायत फलक मिटवून पुन्हा ग्रामपंचायत आमगाव लिहिण्यात आले. जसा सरडा आपला रंग बदलवितो तसा हा फलक आपला रंग बदलवित आहे. नगर परिषद झाली पाहिजे याकरिता अनेक कारणे आहेत. प्रमुख कारण म्हणजे विकास गरजेचा आहे. नगर परिषद झाल्यास मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळणार, अनेक कामांना गती येणार हे निश्चित आहे. नगर परिषद झाली तर कर्मचारी जे आज कार्यरत आहेत त्यांना सुगीचे दिवस येतील हे निश्चित, तशी ते वाट पाहत आहेत. सध्या या कर्मचारी वर्गाच्या चेहऱ्यावर तेजपणा नाही. आमगावचे काय होणार. हीच उत्कंठा कर्मचाऱ्यांना लागली आहे. तेवढीच विविध राजकारण्यांना सुद्धा लागली आहे. काही राजकीय पक्षाचे डावपेच सुरू झाल्याची चर्चा आहे.
एकंदरित नगर परिषद झाली तर पहिला नगराध्यक्ष आपल्या पक्षाचा, आपल्या घरचा माणूस होणार, आपल्या मुलास नगराध्यक्षपद मिळणार याकरिता चारही बाजूनी सारीपाटाचा खेळ सुरू आहे. ज्याचा वजीर चालला तो बादशहा होईल. सध्या तालुक्यात तीन पक्ष प्रबळ दावेदार आहेत. मात्र त्यांच्या सोबतीला मनसे, शिवसेना, बसपा हे सुद्धा या निवडणुकीत दंड थोपटून मैदानात उतरतील. वेळ पडली तर एकमेकांचा आधार घेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. मतदारांचा कौल ज्यांच्याकडे तो सिकंदर होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या मजबूत स्थितीत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. सत्ताबदलाचा फायदा राष्ट्रवादीला मिळणार काय हे निवडणुकीनंतरच सर्वांना दिसेल.
भारतीय जनता पक्षही सर्व ताकत पणाला लावून आपला पहिला नगराध्यक्ष झाला पाहिजे याकरिता प्रयत्न करेल. काँग्रेस पक्षात काही मुरब्बी लोक आहेत. मात्र काहीची ‘पटक दल’ अशी ख्याती आहे. मंचावर बसतील पण आतून काडी चालवून गप्प बसतील व ‘तो मी नव्हेच’ असे नामानिराळे राहून आपली पक्षाबद्दल निष्ठा दाखवतील. या संभावित नगर परिषदेमध्ये बनगाव, आमगाव, रिसामा, कुंभारटोली, किंडगीपार, पदमपूर अशा गावांचा समावेश केला जाण्याची चर्चा आहे. एकूण १७ नगर सेवकांची ही नगर परिषद होईल. जो तो मला तिकीट पाहिजे याकरिता आपल्या पक्षात लॉबींग सुरू करेल. काही चाटूगिरीत मागे राहणार नाही, काही मालसुतो अभियानात अग्रेसर राहतील. कारण संधी नामी चालून येणार आहे. त्याकरिता वाहत्या गंगेत जेवढे हाथ धुवायचे तेवढे धुवून घेऊ, हा धडक उपक्रम काही जण चालवतील. पण नगर परिषद झाली नाही तर नगर पंचायतकरिता लोक लाजेसाठी मैदानात उतरुन आपली ताकत पणाला लावतील. नगर परिषद किंवा नगर पंचायत न होता जर ग्रामपंचायत झाली तर भुकेल्यास मोह गोड याप्रमाणे पूर्ववत आपले नेहमीचेच राहाटगाडगे सुरू ठेवतील.
तात्पर्य आज आमगावला वास्तविकत: नगर परिषदेची आवश्यकता आहे. याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी शासन दरबारात प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाही तर आजची आमगाव नगरीची ‘ना घर का, ना घाट का’ ही स्थिती गंभीर आणि विकासकामांन खिळ बसविणारी आहे.

Web Title: How many days 'no home, no ghat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.