प्रधानमंत्री सन्मान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 09:04 PM2019-04-18T21:04:20+5:302019-04-18T21:06:37+5:30
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते.
अंकुश गुंडावार।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. तसेच निवडणुकीत याचा लाभ मिळवून घेण्यासाठी पहिला हप्ता सुध्दा मार्च महिन्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात आला याची माहिती जिल्हा प्रशासनाकडेच नसून प्रशासनच यापासून अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.
केंद्र सरकारने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली होती. तसेच एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्याने आचारसंहिता लागण्यापूर्वी या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्याची लगईघाई केली. एवढेच नव्हे तर प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील १५ ते २० शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करुन फोटो काढण्यात आले. विशेष म्हणजे यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेला दिवसरात्र जुपंण्यात आले. पण त्यानंतर या योजनेतंर्गत किती शेतकºयांना याचा लाभ मिळाला याची माहिती सध्या जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८५ हजार खातेदार शेतकरी आहे. यापैकी १ लाख ३५ हजार ७८५ शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर शेती आहे. त्यामुळे एवढेच शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेस पात्र ठरले होते. महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेने पात्र शेतकºयांची यादी शासनाच्या एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली.
त्यानंतर ३ हजार ४०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यात येईल, असा संदेश सुध्दा या विभागाला प्राप्त झाला. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत या योजनेतंर्गत किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा झाला याची कुठलीही माहिती या दोन्ही विभागाकडे उपलब्ध नसल्याचे या विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील किती शेतकºयांना मिळाला यापासून स्वत: जिल्हा प्रशासनच अनभिज्ञ असल्याची बाब पुढे आली आहे.
पैसे जमा करण्याची माहिती जिल्हा प्रशासनाला नाही
महसूल आणि कृषी विभागाने दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची संपूर्ण माहिती एनआयसी या संकेतस्थळावर अपलोड केली. त्यानंतर शासनाने किती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा केला याची यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. मात्र तसे करणे टाळले जात असल्याने जिल्हा प्रशासनाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
महसूल व कृषी विभाग याद्या तयार करण्यापुरताच
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी शासनाने या दोन्ही विभागाच्या अधिकाºयांना दिवसरात्र राबवून घेतले. मात्र यानंतर त्यांना किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला याची सुध्दा माहिती उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे या विभागाचे काम केवळ याद्या तयार करण्यापुरतेच असल्याचे दिसून येते.
आचारसंहितेमुळे काम थंडबस्त्यात
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाºया शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आचारसंहिता लागण्यापूर्वी पहिला हप्ता जमा करण्यासाठी लगीनघाई सुरू होती. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असल्याने सध्या हे काम थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे.
हजारो शेतकरी संभ्रमात
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ८७५ शेतकरी पात्र ठरले. मात्र अद्यापही त्यांना पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा होण्याच्या संदेश आला नाही. त्यामुळे हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा होणार की अशा संभ्रमात शेतकरी आहेत.