जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:55 IST2025-03-05T16:54:36+5:302025-03-05T16:55:36+5:30

अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम केली जाणार वसूल : अडीच लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

How many farmers in the district have received the installment of Kisan Samman Yojana? | जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता?

How many farmers in the district have received the installment of Kisan Samman Yojana?

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता सोमवारी (दि.३) ई-केवायसी केलेल्या दोन लाख २० हजार ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांद्वारे सहा हजार रुपयांचा लाभत्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. काही अपात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभघेतल्याचे निदर्शनास आल्याने आता योजनेमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. शिवाय अपात्र शेतकऱ्यांजवळून त्यांनी घेतलेला लाभ परत घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला व रक्कम शासनजमा न केल्यास ती रक्कम त्यांच्या सात-बारावर बोजा चढविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता याच पात्र शेतकऱ्यांना लवकर मिळणार आहे. १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा नमो शेतकरी महासन्मान योजनेप्रती बळावल्या असून शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. ज्यांनी केवायसी केली आहे, अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करुन घेणे गरजेचे आहे. 


लाभार्थी संख्येत झाली घट
योजनेत ई-केवायसी न केलेल्या हजारो शेतकऱ्यांना १९ व्या हप्त्याचा लाभमिळालेला नाही. प्रशासनाने सूचना दिल्यानंतरही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याने लाभ रोखण्यात आला आहे. ई-केवायसी न केल्या आता त्यांना लाभ मिळणार नसून परिणामी योजनेतील लाभार्थी संख्येत घट होणार आहे.


१९ व्या हप्त्याचे झाले सोमवारी वितरण
पीएम किसान सन्मान योजनेत ई-केवायसी व आधार लिंक केलेल्या दोन लाख २० हजार ५७५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभसोमवारी जमा झालेला आहे. 


अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम होणार वसूल
योजनेच्या निकषात अपात्र असताना काही शेतकऱ्यांनी योजनेत नोंदणी करून लाभ घेतला. यापैकी काही शेतकऱ्यांनी रक्कम शासन जमा केली असली तरी अद्याप लाखो रुपयांची रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल व्हायची आहे. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम वसुल करण्यासाठी महसूल विभागाद्वारे कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: How many farmers in the district have received the installment of Kisan Samman Yojana?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.