विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:10+5:302021-07-14T04:34:10+5:30
गोेंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सद्य:स्थितीत काही विशेष रेल्वे ...
गोेंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही. सद्य:स्थितीत काही विशेष रेल्वे गाड्या सुरू असून, लोकल आणि पॅसेंजर गाड्या अद्यापही रुळावर आल्या नाही. कोरोनाच्या नावाखाली अद्यापही विशेष गाड्या सुरू ठेवून दोन पट तिकीट भाडे अधिक आकारले जात आहे. मागील सहा-सात महिन्यांपासून हा असाच प्रकार सुरू असून, प्रवाशांना गरजेपोटी विशेष गाड्यांचे अतिरिक्त भाडे मोजून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची ही एक प्रकारे लूट सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. एसटी, रेल्वेची वाहतूक सुद्धा बऱ्याच प्रमाणात सुरळीत झाली आहे. मात्र यानंतरही रेल्वेने नियमित गाड्यांना दिलेला विशेष गाड्यांचा दर्जा कमी केला नसून अतिरिक्त भाडे आकारणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे गोंदिया ते नागपूर, कोरोबा-अमृतसर, जबलपूर-चांदाफोर्ट, छत्तीसगड एक्स्प्रेेस, समता एक्स्प्रेस, अजमेर-पुरी, गया-चेन्नई यांसह इतर डझनभर विशेष गाड्यांमध्ये स्लिपरमधून प्रवासाठी प्रति व्यक्ती दोनशे ते तीनशे रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत आहे.
..........
प्रवासी म्हणतात...
कोरोनाच्या संसर्गामुळे आधीच अनेकांचा रोजगार गेला आहे. पगारात सुद्धा कपात झाली आहे. अशात रेल्वे विशेष गाड्यांच्या नावावर तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना अजूनही भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाने आता स्थिती पूर्वपदावर आली असल्याने तिकिटांचे दर कमी करायला हवे.
- संतोष वाढई, प्रवासी
................
कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आले असून, रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांच्या संख्येत सुद्धा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही गाड्यांना विशेष गाड्यांचा दर्जा देऊन तिकीट दरात दुप्पट वाढ केली आहे. ती आता त्वरित कमी करण्याची गरज आहे. तसेच लोकल आणि पॅसेंजर गाड्या सुद्धा त्वरित सुरू कराव्यात.
- राहुल पारखी, प्रवासी
..................
आरक्षणाची सक्ती बंद करायला हवी
- रेल्वे गाडीतून गोंदिया ते नागपूर प्रवास करायचा असेल तरी आरक्षण करणे अनिवार्य केले आहे. शिवाय यामुळे अतिरिक्त भाडे सुद्धा प्रवाशांना मोजावे लागत आहे. जवळच्या अंतरासाठी रेल्वे गाड्यांमध्ये जागा उपलब्ध असताना सुद्धा आरक्षण करण्याची अट रद्द करण्याची गरज आहे.
- बरेचदा अनेकांना वेळेवर नागपूर, अमरावती येथे जाण्याची वेळ येते. गोंदिया येथून या ठिकाणी जाण्यास बऱ्याच रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत, मात्र वेळेवर आरक्षण मिळत नसल्याने त्यांना बस गेल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शारीरिक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागतो. त्यामुळे आरक्षणाची लागू केलेली अट रद्द करण्याची गरज आहे.
................
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष गाड्या
गोंदिया ते नागपूर,
कोरोबा-अमृतसर,
जबलपूर-चांदाफोर्ट,
छत्तीसगड एक्स्प्रेेस,
समता एक्स्प्रेस,
अजमेर-पुरी, गया-चेन्नई
..................
तिकिटात फरक किती
कोरोनाचा संदर्भ देत रेल्वे विभागाने विशेष गाड्या सुरू केल्या आहे, मात्र गाड्यांचे तिकिटाचे दर सुद्धा दुप्पट आहे. विशेष गाड्यांचे स्लिपरचे दर ४५० हून अधिकच आहे. गोंदिया-नागपूर स्लिपर कोचचे भाडे १७५ रुपये होते. विशेष गाडीमध्ये यासाठी ३५० ते ४०० रुपये मोजावे लागत आहे. विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर दोनशे ते अडिशे रुपयांनी वाढविण्यात आले आहे. त्यामुळे याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसत आहे.