मुख्य मार्गावरील खड्डे पुन्हा किती बळी घेणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 08:48 PM2017-12-11T20:48:22+5:302017-12-11T20:48:44+5:30
शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
आमगाव : शहरातील मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे असल्यामुळे या मार्गावरुन वाहने चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतसुध्दा वाढ झाली असून आत्तापर्यंत सात ते आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे पुन्हा किती जणांचे बळी घेणार, असा संतप्त सवाल केला जात आहे.
आमगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिक आमगाव येथे येतात. त्यामुळे येथे सतत वर्दळ असते. आमगाव राज्य मार्गावर वाहनांची सुध्दा दिवसभर वर्दळ असते. आमगाव ते सालेकसा राज्य मार्ग, कामठा, गोंदिया, देवरी व शहरातील नटराज मार्ग ते गुरुदेव चौक मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यांवरील एक ते दीड फुटापर्यंतचे खड्डे, डांबरीकरण रस्त्यांवरील उखडलेल्या खड्ड्यांमधील बोल्डर, गिट्टी यामुळे वाहन चालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील महिनाभराच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चार जणांना जीव गमवावा लागला. मात्र यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केलेले नाही.
शहरातील आंबेडकर चौक, शेंडे मार्केट मार्ग, नटराज मार्ग, कामठा चौक या मार्गांवरील खड्ड्यांमुळे वाहने अनियंत्रित होवून अपघाताच्या घटना घडल्या आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रस्ते विकासाची कामे सुरु आहेत. परंतु आमगाव शहर व सीमा राज्य मार्ग अद्यापही विकास कामांपासून वंचित आहेत. त्यासाठी संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
जखमींना वेळेवर मदतीचा हात द्या
मार्गावरील खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहन चालकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. अनेक मार्गावर अपघातातील जखमींना वेळेवर मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करावे. जखमींच्या मदतीसाठी नागरिकांनी मदतीचा हात द्यावा, अशी मागणी युवा शक्ती फाऊंडेशनच्या गुणीराज पटले, सुशीला शिव यांनी केली आहे.