धानाची उचल केल्यानंतरच कळेल धान किती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:51 PM2019-05-02T23:51:54+5:302019-05-02T23:52:52+5:30
सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याच्या तक्रारीनंतर गठीत केलेल्या चौकशी समितीने चौकशीला सुरूवात केली आहे. या समितीने गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे भेट देवून गोदामांची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यातील सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याच्या तक्रारीनंतर गठीत केलेल्या चौकशी समितीने चौकशीला सुरूवात केली आहे. या समितीने गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे भेट देवून गोदामांची पाहणी केली. मात्र संस्थेच्या गोदामात धान किती आहे हे धानाची गोदामातून उचल केल्यानंतरच कळेल.त्यामुळे किती धान कमी आहे अथवा बरोबर हे आताच सांगता येणार नसल्याचे चौकशी समितीने सांगितले.
जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान केंद्र उघडून धान खरेदी केली जाते.यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने जिल्ह्यात ठिकठिकाणी खरेदी केंद्र उघडण्यासाठी सहकारी संस्थाशी करार केला आहे. या संस्था करारनुसार धान खरेदी करुन धानाची उचल होईपर्यंत संस्थेच्या गोदामात ठेवतात.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन टप्प्या टप्याने धानाची राईस मिल मालकांशी करार करुन भरडाईसाठी उचल करते. मात्र तोपर्यंत धान सहकारी संस्थेच्या गोदामात अथवा केंद्रावरच राहतो.मात्र यंदा सालेकसा तालुक्यात १ लाख ४० हजार ५८३ क्विंटल धान खरेदीे करण्यात आली.
यापैकी ७९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली. त्यामुळे सहकारी संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याचा आरोप केला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
चौकशी पूर्ण होईपर्यंत १० गोदामांना सील ठोकण्याचे आदेश दिले. तसेच मार्केटिंग फेडरेशनने याची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यी चौकशी समिती गठीत केली.या समितीत मार्केटिंग फेडरेशनचे मुंबई येथील महाव्यवस्थापक कोक आणि भंडाराचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी खर्चे या समितीने सोमवारपासून (दि.२९) चौकशीला सुरूवात केली. या समितीने जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी करण्यात आलेला, यापैकी भरडाईसाठी किती धानाची उचल करण्यात आली व गोदामात किती धान शिल्लक आहे याची माहिती घेतली. त्यानंतर गुरूवारी (दि.२) सालेकसा येथे पोहचून गोदामांची पाहणी करुन संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
ही चौकशी पुन्हा आठ ते दहा दिवस चालणार असल्याची माहिती आहे. तर जेव्हापर्यंत गोदामांमधील पूर्ण धानाची उचल होत नाही तोपर्यंत गोदामात नेमके किती धान शिल्लक हे सांगता येणार नसल्याचे चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहवालानंतरच कारवाई होणार
सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापैकी किती धान शिल्लक आहे. याची चौकशी सध्या सुरू आहे. चौकशी समितीची धानाची उचल झाल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक यांच्याकडे सोपविणार नाही.त्यानंतर अहवालानंतर पुढील कारवाहीचा निर्णय घेण्यात येणार आहे.
आरोपाचे तथ्य उलगडणार
सहकारी संस्थेच्या गोदामात प्रत्यक्षात खरेदी केलेल्या धानापेक्षा ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार काही जणानी जिल्हाधिकाºयांकडे केली. त्यानंतर या प्रकणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र सहकारी संस्थानी संस्थेवर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. मात्र याचा उलगडा हा चौकशी समितीच्या अहवालानंतरच होणार आहे.
तर फौजदारी कारवाई
सहकारी संस्थेच्या गोदामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या रेकार्डनुसार प्रत्यक्षात कमी धान आढळल्यास संबंधितावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी चौकशी करा
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनप्रमाणेच आदिवासी विकास महामंडळातंर्गत सुध्दा धान खरेदी केली जाते. मात्र त्यांचा धान गोदामात नसून ठिकठिकाणी उघड्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुध्दा आता केली जात आहे.