जिल्ह्यात लसींचा साठा मात्र वाट नागरिकांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:36 AM2021-06-09T04:36:40+5:302021-06-09T04:36:40+5:30
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली असून, त्याची पूर्तता करणे अशक्य आहे. मात्र ही स्थिती पुन्हा उद्भवू ...
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी केली असून, त्याची पूर्तता करणे अशक्य आहे. मात्र ही स्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी शासनाने जास्तीत जास्त लसीकरणावर जोर दिला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरणासाठी पुरेपुरे प्रयत्न केले जात आहे. मात्र आज जिल्ह्यात लसींचा साठा असून, त्याप्रमाणात नागरिक कमी दिसत आहे. अशात आता कोरोनाला मात देण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन स्वत: लस घेण्याची गरज आहे.
देशात तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचे लसीकरण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, या लसींना परदेशात मागणी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला या लाटेत मृत्यूचे प्रमाण मागील लाटेच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. अशात तिसरी लाटेबाबत अंदाज लावले जात असून, ही लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, अवघ्या देशातच लसीकरणाची एक चळवळच शासनाने सुरू केली आहे. जिल्ह्यातही लसीकरणासाठी नवनवे प्रयोग केला जात असून, पात्र असलेल्या समस्त जिल्हावासीयांना लस देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात सोमवारपर्यंतची (दि.७) आकडेवारी बघितल्यास २,८१,७६३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यातील लोकसंख्या बघता हे प्रमाण कमी असल्याचे दिसते. त्याचे कारण असे की, आजही कित्येक नागरिकांत कोरोना लसीला घेऊन भीती व भ्रम आहेत. परिणामी ते लस घेण्यास पात्र असूनही लस घेत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी लसीकरणासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना लसींचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता जिल्ह्यात लस उपलब्ध असूनही नागरिक लसीकरणासाठी पुढे येताना दिसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी लसीकरणासाठी आता जनजागृतीची गरज पडत आहे.
------------------------------------
जिल्ह्यात ३५००० उपलब्ध
जिल्ह्यात आजघडीला ३५००० डोस उपलब्ध असल्याची माहिती आहे. यामध्ये १५ डोस कोविशिल्डचे असून सोमवारी (दि.७) कोव्हॅक्सीनचे २० हजार डोस मिळाले आहेत. हे सर्व डोस लसीकरण केंद्रांना वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आता नागरिकांना ऑनलाइन नोंदणीचीही गरज नसून केंद्रात गेल्यावर लगेच नोंदणी व लस दिली जात आहे. अशात आता नागरिकांनी आपल्या स्वत:च्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी लस घेण्याची गरज आहे.
-----------------------------------
गावागावांत सुरू आहे जनजागृती
कोरोना लसीला घेऊन नागरिकांत एक भीती व भ्रम दिसून येत आहे. परिणामी वयोगटात बसूनही नागरिक लस घेण्यासाठी घाबरत आहेत. नागरिकांमधील हा भ्रम व भीती निघून जावी यासाठी आता गावागावात जनजागृती केली जात आहे. मात्र लसीची सुरक्षितता व त्याचे परिणाम दुसऱ्या लाटेत अधिक चांगल्याने दिसून आले असून, शास्त्रज्ञांनीही त्याला दुजोरा दिला आहे.