मानव विकासच्या बसेस पोहोचल्या नाही

By admin | Published: August 19, 2014 11:48 PM2014-08-19T23:48:40+5:302014-08-19T23:48:40+5:30

विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मानव विकास योजनेतून जिल्ह्यात नव्याने १६ बसेस येणार होत्या. गावागावात एसटी महामंडळाने रस्त्यांचे सर्व्हेक्षण केले. यामुळे बस येणार अश्या ग्रामीण

Human development buses have not been reached | मानव विकासच्या बसेस पोहोचल्या नाही

मानव विकासच्या बसेस पोहोचल्या नाही

Next

गोंदिया : विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मानव विकास योजनेतून जिल्ह्यात नव्याने १६ बसेस येणार होत्या. गावागावात एसटी महामंडळाने रस्त्यांचे सर्व्हेक्षण केले. यामुळे बस येणार अश्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र शैक्षणिक सत्र होऊन तीन महिने लोटले. परंतु बसेस पोहोचल्याच नाही. परिणामी ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेची पायदळ वारी करावी लागत आहे. दळणवळणाच्या साधनांअभावी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी अवागमन करणे कठिण झाले आहे.
खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांना स्कुलबसेसची सुविधा असली तरी शासकीय शाळेत शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना महामंडळाच्या बसवरच अवलंबून राहावे लागते. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एसटीची सवलत आहे. पुन्हा मानव विकासच्या बसची यात भर पडली आहे. जिल्ह्यात मानव विकासच्या २० बसेस १० हजार ५०५ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत पोहोचविण्याचे काम करीत आहेत. असे असले तरी देखील जिल्ह्यातील शेकडो गावांना अद्यापही एसटीचे दर्शन झाले नाही. येथील विद्यार्थी सायकलने किंवा पायदळच शाळेत जात आहेत. ज्या गावात बस जात नाही अशा गावात बस पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाने जुलै महिन्यात सर्व्हेक्षण केले. शेकडो गावातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.सर्व्हेनंतर जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रत्येकी २ प्रमाणे १६ बसेस मिळणार होत्या. अनेक मार्गावर अडचणी असल्याने संबंधित ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, विद्युत विभागाला पत्र देवून रस्ते व्यवस्थित करुन वाहतुकी योग्य करण्यात आले. सर्व्हेदरम्यान फक्त गोरेगाव तालुक्यातील एक मार्ग वाहतुकीस अयोग्य ठरला. बाकी सर्व मार्ग वाहतुकीस योग्य ठरविण्यात आले. यामुळे या भागातील विद्यार्थी तथा पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु शालेय सत्र सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र मानव विकासच्या ‘त्या’ १६ बसचा पत्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
१६ बसेस आल्यानंतर ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सोयीस्कर ठरेल अशा आशा असताना बसेस मात्र पोहोचल्याच नसल्याने ‘त्या’ विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. उल्लेखनिय असे की, सडक/अर्जुनी तालुक्यासाठी दोन बसेस मंजूर असतानासुद्धा संबंधितांनी सदर तालुक्याला बसची गरज नाही, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. एकीकडे विद्यार्थी बसकरिता हेलपाटे खात आहेत. तर दुसरीकडे बसची गरज नसल्याचे सांगण्यात येत असल्याने या पत्रावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सवलत देण्यात येते. गोंदिया आगारांतर्गत जिल्ह्यातील १० हजार ५०५ विद्यार्थी या योजनांचा फायदा घेवून शाळेपर्यंत मोफत प्रवास करीत आहेत.
अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत २ हजार ८४३ विद्यार्थी पास सवलतीचा फायदा घेत आहेत. मानव विकास अंतर्गत जिल्ह्यातील ४ तालुक्यात २० फेऱ्या होत असून या अंतर्गत २ हजार २९९ विद्यार्थी प्रवास करीत आहेत. विद्यार्थी पास सवलत योजनेंतर्गत २ हजार ६१३ विद्यार्थी तर व्यावसायीक अभ्यासक्रम घेणारे २ हजार ७५० असे एकूण १० हजार ५०५ विद्यार्थी मोफत बस प्रवास सवलत योजनेचा फायदा घेत आहेत.
जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये रस्ते बरोबर नसल्याच्या कारणावरून तर काही ठिकाणी कमी उत्पन्नाचा नावावर एसटीची सेवा दिली जात नाही. अशा गावांत मानव विकासाच्या ‘त्या’ १६ बसेस पोहोचल्यावर तेथील विद्यार्थ्यांना चांगल्या दिवसाची प्रतिक्षा होती. मात्र, सत्र अर्ध्यावर आले तरीही बसचा पत्ताच नाही. परिणामी ग्रामीण विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शैक्षणिक सत्र संपल्यावर बसेस येणार का? असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालक व्यक्त करू लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Human development buses have not been reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.