गंगाबाईत होणार ‘ह्यूमन मिल्क बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:00 AM2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:01+5:30
गोंदिया जिल्ह्यातील गर्भवतींना गर्भावस्थेत संतुलीत आहार दिला जात नसल्यामुळे त्यांच्या पोटातील बाळाची वाढ खुंटते. परिणामी बहुतांश बालके ही कमी वजनाची व व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. गोंदिया जिल्ह्यात एकमेव असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात वर्षाकाठी आठ हजारांच्या घरात प्रसूती केल्या जातात. यापैकी २० टक्के बालके ही कमी वजनाची असतात.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बाळांसाठी आईचे दूध अमृत असल्यामुळे बाळांना आईचेच दूध मिळाल्यास ५० टक्के आजार त्यांच्याजवळ येतच नाहीत. कमी वजनाची, इन्फेक्शन किंवा व्यंगत्व घेऊन जन्माला आलेल्या बालकांना उपचारासाठी अतिदक्षता कक्षात दाखल केले जाते. अशा बाळांना पोषण म्हणून आईचेच दूध मिळावे यासाठी आता येथील गंगाबाई स्त्री रूग्णालयात ‘ह्यूमन मिल्क बँक’ तयार केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गर्भवतींना गर्भावस्थेत संतुलीत आहार दिला जात नसल्यामुळे त्यांच्या पोटातील बाळाची वाढ खुंटते. परिणामी बहुतांश बालके ही कमी वजनाची व व्यंगत्व घेऊन जन्माला येतात. गोंदिया जिल्ह्यात एकमेव असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात वर्षाकाठी आठ हजारांच्या घरात प्रसूती केल्या जातात. यापैकी २० टक्के बालके ही कमी वजनाची असतात. आईचे दूध बाळासाठी किती महत्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी या ‘ह्यूमन मिल्क बँक’ची मदतही मिळणार आहे. निसर्गाने बाळाच्या गरजेनुसारच आईचे दूध तयार केले आहे. परंतु माणूस गायी, म्हशी, शेळी व उंटाचे दूध वापरतात. या दूधातून जेवढा फायदा बालकाला होत नाही तेवढा फायदा आईच्या दूधातून होते. आईच्या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व मेंदूच्या वाढीसाठी आईचे दूध महत्वाची भूमीका बजावते.
ज्या महिलेची शस्त्रक्रिया झाली असेल, काही कारणामुळे दूध निघत नाही, बाळ कमजोर असून आईच दूध ओढू शकत नाही, सेफ्टीसिमीया किंवा सिव्हीयर आजार असल्यास बालकाला दूध देता येत नाही. ज्या मातेला एचआयव्ही आहे तिच्या बाळाला तिचे दूध पाजता येत नाही, आईला किंवा बाळाला आजार असेल अशा वेळी बाळाला दूध मिळत नाही. अशा बाळाला दूधाची गरज असतांना त्याला सहज दूध उपलब्ध व्हावे यासाठी ‘ह्यूमन मिल्क बँक’ ही खूप मदत करणार आहे. काही मातांना दूध येत नाही आले तर कमी असते. अशातच बाळाच्या दुधाची गरज ही दुसऱ्या मातांच्या दूधातून भागवता येईल यासाठी ‘मिल्क बँक’ मदत करणार आहे. दुसऱ्या आईचे दूध आधीच गोळा करून निर्जंतीकीकरण करून फ्रिजरमध्ये ठेवून ते दूध बाळाला देता येईल. ‘ह्यूमन मिल्क बँक’ तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अवघ्या सहा महिन्यांत ही बँक अस्तीत्वात येणार आहे. गंगाबाईतील नवजात बाळांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘ह्यूमन मिल्क बँक’ महत्वाची भूमीका बजावणार आहे.
दूध घेण्यापूर्वी होणार बाळंतिनींची तपासणी
बाळंतिन महिला आपल्या बाळाला दूध अपुरे पडेल, मी असक्त होईन असे विविध प्रश्न उपस्थित करतील यासाठी त्यांचे दूध देण्यासाठी त्यांचे समूपदेशन केले जाईल. पौराणीक कथेतील भगवान श्रीकृष्णाने आई देवकीचे दूध प्यायले नाही. माता यशोदाचे दूध प्यायले तसेच नवजात बाळांना जीवनदान देण्यासाठी अमृतमयी पाझर चिमुकल्या बाळांसाठी सोडा असे भावनीक आवाहनही या बँकेत राहणाऱ्या समूपदेशकांकडून होणार आहे. मातांनी दूध दिल्यास दूध भरून निघते व दोन तासांतच आईचे दूध वाढते. दूध देण्यापूर्वी त्या बाळंतिनींची मोफत तपासणी करून त्यांना दूध देण्यापूर्वी अन्न देऊन त्यांचे दूध वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
सहा महिन्यांपर्यंत राहू शकते ते दूध
४‘ह्यूमन मिल्क बँक’च्या माध्यमातून एकदा घेतलेले ते दूध तब्बल सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येते. दूध घेऊन निर्जंतूक केल्यानंतर तापमान मायनस २० डिग्रीत ठेवावे लागते. परंतु ते दूध चार महिन्यातच वापरण्यात येणार आहे. ३०० मिली पर्यंतचे दूध महिलांकडून एका दिवसातून संकलीत करण्यात येईल. गंगाबाईतील अतिदक्षता कक्षात असलेल्या बाळांना दररोज दूधाची समस्या निर्माण होते.
कोणत्या महिलांचे दूध घेतले जाईल?
बाळंतिनींना आपले दूध या बँकमध्ये देण्यासाठी त्यांना समूपदेशन केले जाईल. तेथील महिलांच्या मदतीने बाळंतिनींना दूध देण्यास मदत होईल. ज्या महिलांची प्रसूती गंगाबाईत स्त्री रूग्णालयात होईल त्याच बाळंतिनीकडूनच त्यांचे दूध घेऊन ‘ह्यूमन मिल्क बँक’ मध्ये ठेवले जाईल. एचआयव्हीग्रसीत महिला, सेफीलीस, ओपन ट्यूबर क्लॅसिस, हेपेटायटीस-बी, हेपेटायटीस-सी अशा आजार असलेल्या बाळंतिनींचे दूध घेतले जाणार नाही. परंतु सर्वसाधारण आजार जसे मधूमेह, हायपरटेंशन, थायरॉईड आजार दूधात येत नसल्यामुळे त्या मातांचे दूध सहजरित्या कोणत्याही बाळाला देण्यात येईल. ज्या आजारांचा संबंध दूधाशी येतो त्या आजाराच्या बाळंतीनीचे दूध घेतले जाणार नाही.
अतिदक्षता कक्षातील बालकांना दूध देण्यासाठी त्यांच्या आईला त्या कक्षात येणे कठिण असते. परंतु बाळाला दूध देणे महत्वाचे असल्यामुळे आम्ही कक्षात एक वेगळी खोली तयार करून त्यांना प्रवेश देतो. परंतु रात्री १२ ते १४ तासाच्या वेळामुळे बाळांना आईचे दूध मिळू शकत नाही. त्यामुळे बालकांना पावडरचे दूध नाईलाजास्तव पाजावे लागते. परंतु ही ‘ह्यूमन मिल्क बँक’ तयार झाल्यास बाळांना पावडरचे दूध दिले जाणार नाही आणि बाळांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल.
-डॉ. प्रदीप गुजर
बालरोग विशेषतज्ज्ञ,
बीजीडब्ल्यू गोंदिया