डॉक्टरातही असतो माणुसकीचा झरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 09:03 PM2019-05-04T21:03:10+5:302019-05-04T21:04:19+5:30
एखाद्या भिकारी व वेड्यापिशा व्यक्तीप्रती माणूसकी दाखविणारे व्यक्ती फारच कमी असतात. त्या वेड्या माणसाला जवळ करणे त्याच्या जेवण व राहण्यासह पिण्याच्या पाण्याची सोय करणारा व्यक्ती आज शोधूनही सापडत नाही.
राजेश मुनिश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : एखाद्या भिकारी व वेड्यापिशा व्यक्तीप्रती माणूसकी दाखविणारे व्यक्ती फारच कमी असतात. त्या वेड्या माणसाला जवळ करणे त्याच्या जेवण व राहण्यासह पिण्याच्या पाण्याची सोय करणारा व्यक्ती आज शोधूनही सापडत नाही. पण एका शासकीय आरोग्य विभागात नोकरी करुन एका वेड्याची काळजी घेणारा माणूस तालुक्यातील ग्राम खोडशिवनी येथे बघावयास मिळत आहे.
खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत डॉ. समीर गहाणे हे गिरोला-खोडशिवनी मार्गाने येत असता त्यांना एक वेडसर इसम रस्त्याच्याकडेला दिसला. जानेवारी महिन्यात दिसलेल्या या वेडसर इसमाची दाढी-मिशी व केस वाढलेले होते. डॉ. गहाणे यांच्या मनात नेहमी त्या वेडसर इसमाच्या जेवण व पाण्याविषयी नेहमी प्रश्न निर्माण होत होते. तो इसम एखाद्या दिवसी अन्न व पाण्याविना मरुन गेला तर असे विविध प्रश्न त्यांच्या मनात दोन दिवस घोंगावत होते.
एक दिवशी त्यांनी आपली गाडी थांबवून त्या वेडसर इसमाची विचारपूस केली. मात्र तो जास्त काहीच बोलत नव्हता. डॉ. गहाणे यांनी त्याला आपला रोजचा जेवणाचा डब्बा व पिण्याच्या पाण्याची बाटली दिली. त्या वेड्याने जेवण करून पाणी पिले त्यात डॉ. गहाणेंच्या मनाला समाधान वाटले. तेव्हाच त्यांनी मनात निश्चय केला की त्या इसमाला रोज जेवण व पिण्याचे पाण्याची सोय करावी. त्याप्रमाणे खोडशिवनी येथील कंगाले या महिलेकडून डब्बा बनवून रोज त्या इसमापर्यंत सकाळ-सायंकाळी पोहचवून देण्याच्या कामात गावातीलच विलास यांनी मदत केली.
त्या इसमाची दाढी-मिशी व केस वाढल्याने गावकऱ्यांच्या मदतीने डॉ. गहाणे यांनी त्याचे केस कापले.
तसेच त्या इसमाच्या रोजच्या डब्याचा खर्च डॉ. गहाणे यांनी उचलला तर देवा कापगते यांनी नवीन कपडे घेवून दिले. रुग्ण सेवेसोबत अनाथाची आई व एखाद्याचा कुणीच वाली नाही त्याचा भाऊ होण्यास धन्यता मानणाऱ्या डॉ. गहाणे यांना बघून डॉक्टरालाही असतो माणूसकीचा झरा असे म्हटले जात आहे.
उपचारासाठी रूग्णालयात केले दाखल
बघता-बघता उन्हाळा सुरु झाल्याने उन्हात तो वेडसर इमस मरुन जाईल, त्यामुळे देवराज मुनेश्वर व सतीमेश्राम यांच्या मदतीने साकोली येथील दवाखान्यात उपचार करुन त्या इसमाला भंडारा जिल्हा रुग्णालयात भर्ती केले. तसेच भंडाराचे जिल्हा न्यायाधीश यांच्या व पोलिसांच्या परवानगीने पुढील उपचारासाठी नागपूर येथील मनोरूग्णांच्या हॉस्पीटल मध्ये भर्ती करण्यात आले आहे.