पोलीस मित्रांची अशीही मानवता
By admin | Published: February 20, 2016 02:39 AM2016-02-20T02:39:39+5:302016-02-20T02:39:39+5:30
शहरातील टीबीटोली परिसरातील चर्चजवळ रस्त्याच्या कडेवर अर्धनग्न अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीला रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या...
गरिबाला मायेचा हात : उपचारासाठी केले रुग्णालयात दाखल
गोंदिया : शहरातील टीबीटोली परिसरातील चर्चजवळ रस्त्याच्या कडेवर अर्धनग्न अवस्थेत पडून असलेल्या व्यक्तीला रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पोलीस मित्रांनी मदतीचा हात दिला. सदर व्यक्ती अशक्त असल्याचे पाहून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. याशिवाय त्याला कपडेही देण्यात आले.
पोलीस मित्र शशीकुमार पटेल हे गुरूवारच्या रात्री टिबी टोली परिसरातील चर्चजवळून जात असताना त्यांना अर्धनग्न अवस्थेत एक व्यक्ती पडून असल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती मानवाधिकार संघटनेचे सचिव व पोलीस मित्र आदेश शर्मा तसेच महिला अध्यक्ष धर्मिष्ठा सेंगर यांना दिली. त्यांनी सदर व्यक्तीची पाहणी करून स्थानिक पोलिस ठाण्याचे ठाणेदार बाळासाहेब पवार यांना संबंधित व्यक्तीविषयी सांगितले. दरम्यान ठाणेदार पवार यांनी आपल्या अधिकाऱ्यांना घटनास्थळावर पाठविले.
यावेळी रामनगर पोलीस व पोलीस मित्रांनी स्वखर्चातून ब्लँकेट खरेदी करून त्या गरजू व्यक्तीला भेट स्वरूपात दिले. मात्र अनेक दिवसांपासून उपाशी असल्याने तो अशक्त आढळून आल्यामुळे त्याला सर्वप्रथम जेवणाचीही सोय करण्यात आली. नंतर उपचारासाठी स्थानिक जिल्हा सामान्य रु ग्णालयातही त्याला भर्ती करण्यात आले.
यावेळी पोलीस मित्र आदेश शर्मा, प्रमोद पटले, हेमा पटेह, पोलीस अधिकारी धनबाती, धर्मीष्ठा सेंगर आदी पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)