पोळ्यावर अवकळा
By Admin | Published: August 26, 2014 12:03 AM2014-08-26T00:03:00+5:302014-08-26T00:03:00+5:30
वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे पूजन करण्याचा आणि सर्वांच्या पोषिंद्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिवस असलेला पोळा सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडला.
शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण : शहरात पूजेसाठीही बैल मिळेना
गोंदिया : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे पूजन करण्याचा आणि सर्वांच्या पोषिंद्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिवस असलेला पोळा सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडला. मात्र पोळ्यातील उत्साह दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. शहरी भागात तर पुजेसाठीही बैलजोडी दिसत नसल्याने बैलांसाठी तयार केलेले नैवेद्य अनेकांना तसेच ठेवावे लागले.
गोंदिया शहरात तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा न्यायालयाकडील बोळीत छोटेखानी पोळा भरतो. याशिवाय गोविंदपूर, फूलचूर, कुडवा या भागातही पोळा भरविला जातो. परंतू दरवर्षी दिसणारा उत्साह यावर्षी फारशा प्रमाणात दिसला नाही. त्यामुळे उत्कृष्ट बैलजोडीसाठी असलेली स्पर्धा, झडत्या यांचीही कमतरता यावेळी जाणवली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यापुरताच आता पोळा शिल्लक राहिला की काय, असे वातावरण पोळ्यातील हा निरुत्साह पाहून जाणवत होते.
गोंदियात तहसील कार्यालयाच्या परिसरात या निमित्ताने लागणारी मुलांची खेळणी, फुगे विक्रेत्यांची धावपळ मात्र दिसत होती. एरवी प्रत्यक्ष बैल पाहणे दुरापास्त झालेल्या आपल्या मुलांना पोळ्याच्या निमित्ताने सजलेले बैल दाखविण्यासाठी अनेक पालक येथे येत असतात. त्यामुळे फुगे व खेळणी विक्रेत्यांचा धंदा चांगला होतो. मुलांमधील हा उत्साह यावर्षीही दिसत होता. परंतू काही वेळासाठी येथे भरलेल्या पोळ्यात मोजक्याच बैलजोड्या आल्या होत्या. त्या सुद्धा लवकरच तेथून दिसेनास्या झाल्यामुळे अनेकांना बैलजोडीचे दर्शनही घेता आले नाही. पोळा फुटल्यानंतर शेतकरी घरोघरी आपल्या बैलांना फिरवितात. त्या निमित्ताने महिला त्यांची पुजा करून नैवेद्य चारतात. पण अनेकांना बैलाची वाट पाहावी लागत होती.
ग्रामीण भागात थोडाफार उत्साह दिसून आला. परंतू अनेकांकडे बैलजोड्यात आता राहिलेल्या नसल्यामुळे पोळ्यातून दिवसेंदिवस बैलांची संख्याही कमी होत असल्याचे दिसून आले. पूर्वी प्रत्येक घरी बैलजोड्या असायच्या. या बैलांच्या माध्यमातूनच शेतीच्या मशागतीसह सर्व कामे केली जात होती. परंतू आता अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आले आहेत. ट्रॅक्टरनेच मशागत होत असल्यामुळे बैल पोसण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही. यामुळे पोळ्याचा उत्साह कमी झाला असला तरी शेतकऱ्यांचा सण म्हणून ग्रामीण भागात या सणाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जात असल्याचे दिसून आले. (जिल्हा प्रतिनिधी)