संततधार पावसाने शेकडो घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 10:18 PM2019-08-14T22:18:59+5:302019-08-14T22:19:55+5:30
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन झाले असून मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो घरांची पडझड झाली. तर पावसामुळे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनर्रागमन झाले असून मंगळवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे चार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शेकडो घरांची पडझड झाली. तर पावसामुळे अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील काही मार्ग बंद झाले होते. बुधवारी सकाळी ११ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले. पावसामुळे घरे आणि गोठे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजतापर्यंत सरासरी ६५.५१ मि.मी.पावसाची नोंद झाली.दुपारनंतर पावसाने उघडीप घेतली होती.
सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे पुनर्रागमन झाले. मंगळवार आणि बुधवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.त्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते.अर्जुनी मोरेगाव तालुक्यातील बोरी-मांडोखाल,इटखेडा-सिरोली, बोरी ते कोरंभीटोला मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने बुधवारी सायंकाळपर्यंत हे मार्ग बंद होते. तर या भागात पावसाची रिपरिप कायम होती. मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव ६७.४०, तिरोडा ११६, अर्जुनी मोरगाव ७२.९६ आणि सडक अर्जुनी तालुक्यात ७२.५३ मि.मी.पावसाची नोंद झाल्याने या तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. शेतातील बांध्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रोवणीची कामे सुध्दा शेतकऱ्यांना बंद ठेवावी लागली. या चार तालुक्यांच्या तुलनेत गोंदिया ४९.५७, देवरी ३५.७०, सालेकसा ४७.५३, आमगाव तालुक्यात ४०.५० मि.मी.पावसाची नोंद झाली. या तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाला.
संततधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव, तिरोडा, सडक अर्जुनी व गोरेगाव या तालुक्यात ३३६ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यात ६ घरे पूर्णत: कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
महसूल विभागाने प्राथमिक सर्वेक्षण करून पडझड झालेल्या ३३६ घरे आणि गोठ्यांपैकी १६५ घरे आणि गोठे मदतीस पात्र ठरविले.जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे चार दरवाजे ०.३० मिटरने उघडण्यात आले होते.धरणातून पाणी सोडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठा लगतच्या गावकऱ्यांना सर्तकतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला होता.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ७७ टक्के पाऊस
जून आणि जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने पावसाची तूट वाढली होती.त्यामुळेच दमदार पावसानंतरही सरासरी गाठलेली नाही.जिल्ह्यात मागील वर्षी १४ आॅगस्टपर्यंत ८२ टक्के पाऊस झाला होता. यंदा याच तारखेपर्यंत ६६९.५५ मि.मी.म्हणजे ७७ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात याच तारखेपर्यंत ८६९.६९ मि.मी.सरासरी पाऊस पडतो. मात्र आत्तापर्यंत केवळ ७७ टक्के पाऊस झाल्याने पावसाची तूट कायम आहे.
रोवणीसाठी होणार मदत
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच यापूर्वी केलेल्या रोवण्यांना देखील या पावसाची मदत होणार आहे. दमदार पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
धरणातील पाणीसाठ्यात वाढ
जिल्ह्यात जून जुलै महिन्यात पाऊस झाला नव्हता त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा शिल्लक होता.त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून सिंचन प्रकल्पांमध्ये सरासरी ५० टक्के पाणीसाठा आहे.
नुकसानीच्या सर्वेक्षणाला सुरूवात
मंगळवारी रात्रीच्या सुमारास अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. पावसामुळे पडलेल्या घरे आणि गोठ्यांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास महसूल विभागाने सुरूवात केली आहे.
तिरोडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
तिरोडा तालुक्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वाधिक ११६ मि.मी.पावसाची नोंद झाली होती.त्यामुळे या तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत होते. तर काही नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत होते.या पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची तिरोडा तालुक्यात नोंद झाली आहे.