शेकडो एकरातील धान भरलेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:19 AM2018-11-14T00:19:20+5:302018-11-14T00:19:54+5:30
शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकºयांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकºयांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वडेगाव : शेतकरी विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे बियाणे खरेदी करतात मात्र यंदा याच बियाण्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. शेकडो एकरात लागवड केलेले महाबीजचे सह्याद्री धान भरलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक सकंट ओढावले असून पूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागले आहे.
प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पाऊस समाधानकारक झाल्याचे पाहून महागडे व विश्वासाचे बियाणे म्हणून महाबीजचे सह्याद्री ४ चे धानाचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी केले. सदर बियाणांचे रोप व्यवस्थीत आल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकाची रोवणी केली. प्रमाणानुसार खताची मात्रा दिली. अनेक शेतकऱ्यांनी श्री पध्दतीने धान पिकाची लागवड केली.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सदर धानाची लागवड करण्यात आली. वेळेवर धानाला लोंब लागले परंतू २० ते २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी धानाचे लोंब भरलेच नाही. पोसट लोंब निघाल्यामुळे शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन घेताच आले नाही. या धानापासून केवळ तणसीच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
कोयलारी येथील डॉ. मुकेश पटले यांनी त्यांच्या सहा एकर शेतात सह्याद्री ४ या धानाची लागवड केली. पिकाला वेळोवेळी खत व पाणी दिले. मात्र लोंब येवून सुध्दा धान भरल्यामुळे सदर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. दरम्यान याची तक्रार तालुका कृषी अधिकारी व महाबीजकडे करण्यात आली आहे.
याप्रकरणी संबंधित कृषी अधिकारी व महाबीजने लक्ष देवून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी मुकेश पटले, चंद्रराज कटरे व इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
सह्याद्री ४ हे महाबीजचे बियाणे १६ जूनला नागपुरे कृषी केंद्र बिर्सी येथून ०५४४६ या बॅच क्रमाकांचे १२ पोती खरेदी करुन त्याची शेतात लागवड केली. मात्र धानाचे लोंब भरलेच नाही त्यामुळे पूर्ण हंगामाला मुकावे लागले असून मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे महाबीजने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.
-डॉ. मुकेश पटले, शेतकरी
शेतकऱ्यांनी सह्याद्री ४ या महाबीजच्या बियाणांची व्यवस्थीत पेरणी करुन पीक लावले होते. पीक उत्तम होते. किडरोगांचा प्रादुर्भाव देखील नव्हता. मात्र धान भरलेच नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे.
- एम.डी.डोंगरवार, कृषी सहायक.