शेकडो आदिवासी विद्यार्थी भगवान भरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:53 AM2017-08-05T00:53:12+5:302017-08-05T00:53:56+5:30
शासकीय व खासगी आश्रमाशांळांमधील अनागोंदी कारभारामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : शासकीय व खासगी आश्रमाशांळांमधील अनागोंदी कारभारामुळे काही ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या. मात्र यानंतर काही आश्रमशाळा व वसतिगृह व्यवस्थापनाने बोध घेतला नसल्याचे चित्र आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांन रात्री भगवान भरोसे सोडून जवाबदार कर्मचारी मुख्यालयातून गायब राहत असल्याची धक्कादायक बाब सालेकसा तालुक्यात पुढे आली आहे.
सालेकसा तालुक्यातील विविध आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहात सध्यास्थितीत दीड हजार आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. प्रतिनिधीने जमाकुडो येथील आश्रमशाळेला भेट दिली असता रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांची सुरक्षा वाºयावर असल्याची बाब निदर्शनास आली.
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळावी, निवासी राहून त्यांना शिक्षण घेता यावे. यासाठी शासनाने आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृह सुरू केले. मात्र त्यांच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्याने बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. सालेकसा तालुक्यात दोन शासकीय आश्रमशाळा आहेत. शासकीय आश्रमशाळामध्ये शंभर टक्के शासनाच्या अनुदातून आणि खासगी शाळांमध्ये शासनाच्या ७५ टक्के आणि व्यवस्थापनाच्या २५ टक्के अनुदानातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्व सोयी सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र प्रत्येक्षात त्याचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे.
जमाकुडो येथील आश्रमशाळेत १३८ मुले आणि १६७ मुली असे एकूण ३०५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे भेट दिली असता धक्कादायक बाबी पुढे आल्या. शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक हे मुख्यालयी तर राहत नाही. अधीक्षक आणि त्यांचे सहकारी सुद्धा रात्रीला मुख्यालयी न राहता विद्यार्थ्यांना भगवान भरोसे सोडून अपडाऊन करतात. जिल्ह्यात किंवा विभागात एखाद्या शाळेत एखादी घटना घडली की कर्तव्य तत्पर असल्याचे दाखविण्यासाठी एक दोन दिवस मुख्यालयी राहत असल्याची बाब पुढे आली.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन इमारत बांधली. मात्र त्याच्या देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने पटसंख्या घसरत आहे. त्यामुळे अनेक खोल्या रिकाम्या आहेत. कर्मचारी वसाहतीच्या इमारती ओस पडल्या आहेत. चारही बाजूला उंच-उंच गवत, जुने साहित्य पडले आहेत.
शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे आहेत. त्यामुळे चार्मोशी येथील घटनेची येथे पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामाजिक न्याय मंत्र्याच्या जिल्ह्यातच आश्रमशाळा व वसतिगृहांची ही स्थिती आहे.
शौचालय, स्वच्छतागृहांची दुरवस्था
शौचालय आणि मुत्रीघराची पाहणी केली असता सर्वत्र घाणच घाण आढळली. गेल्या कित्त्येक दिवसांपासून त्यांची साफसफाई केलेली नाही. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई केली जात नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
अधीक्षक तीन वर्षांपासून गैरहजर
नियमित अधीक्षक तीन वर्षापासून गैरहजर असल्याची बाब पुढे आली. सध्या प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधीक्षकाने माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
मेनूप्रमाणे जेवण नाही
विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणाच्या मेनू संदर्भात अधीक्षकांना विचारले असता त्यांनी माहिती देणे टाळले. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी मेनू प्रमाणे कधी जेवण मिळत नसल्याचे सांगितले.