भूक,दहशतीत गावाकडे निघाले पायी मजुरांचे जत्थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 05:00 AM2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:15+5:30
सर्वांच्याच मनामध्ये एक अनामिक दहशत पसरली आहे.आपल्या गावाच्या घराच्या ओढीने सर्वच साधने नसतानाही पायी निघाले आहेत. गोदिया जिल्ह्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांची संख्या कमी नाही तर बाहेर राज्यात गोदिया जिल्ह्यातील मजुरांची संख्याही मोठी आहे. रविवारी सकाळीच अठरा युवकांचा एक जत्था हैदराबाद येथून सहाशे किमीचा रस्ता पायी तुडवित गोरेगाव शहरात दाखल झाला.
दिलीप चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आला. पोटपाण्यासाठी इतरत्र राज्यातून आलेल्या मजुरांना घरमालकांनी घर सोडण्याचे फर्मान सोडल्यावर अनेक भाडेकरू मजुरांचे धाबे दणाणले.अनेक मजूर व मार्केटिंग क्षेत्रात काम करणारे युवक भूक, दहशतीत आपल्या गावी पायी जातानांचे चित्र सध्या सर्वत्र पाहयला मिळत आहे. असेच दोनशे मजुरांचे जथ्थे रविवारी (दि.२९) रोजी शहरात धडकले. तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. ज्या भुकेला शमविण्यासाठी ते रोजगारासाठी गोंदियाला आले होते ती भूक माणुसकीवर चिंतन करणारी तेवढीच मानवी संवेदना बोथट करणारी होती.
गोरेगाव नगर पंचायत, भारत गॅस एजन्सी, युवा शक्ती स्पोटर्स व गोरेगाव मंथन ग्रुपच्या सदस्यांनी त्या सर्व मजुरांची चौकशी केली. चहा, नास्ता व गाडीची व्यवस्था करून त्यांना कोहमारापर्यत सोडून दिले. कोरोनाने देशभरासह विदर्भातही थैमान घातले आहे.
सर्वांच्याच मनामध्ये एक अनामिक दहशत पसरली आहे.आपल्या गावाच्या घराच्या ओढीने सर्वच साधने नसतानाही पायी निघाले आहेत. गोदिया जिल्ह्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या मजुरांची संख्या कमी नाही तर बाहेर राज्यात गोदिया जिल्ह्यातील मजुरांची संख्याही मोठी आहे. रविवारी सकाळीच अठरा युवकांचा एक जत्था हैदराबाद येथून सहाशे किमीचा रस्ता पायी तुडवित गोरेगाव शहरात दाखल झाला. सतत सहा दिवस पायी चालत आलेल्या मजुरांचे हाल पाहण्यासारखे होते. हे सर्व मजूर तिरोडा तालुक्यातील असल्यामुळे आ.विजय रहांगडाले यांना कळविण्यात आले. त्यांनी लगेच नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. बारेवार यांनी भारत गॅस एजन्सीचे मालक नितीन बारेवार, सामाजिक कार्यकर्ते टिटू जैन यांच्या मदतीने चहा, नास्त्याची व्यवस्था करून सर्व मजुरांना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोडण्यात आले. परत अकरा वाजताच्या सुमारास बुलढाणा, अकोला येथील मजूर गोंदिया येथून रेल्वे मार्गाने गोरेगाव येथे पोहचले त्यांचीही चहा नास्त्याची व्यवस्था करून सर्व मजुरांना कोहमारा येथे सोडण्यात आले.
सायंकाळी आलेल्या मजुरांची जेवनाची व्यवस्था करून त्यांची बस स्टॉपवर झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. सोमवारी (दि.३०) सकाळी अठरा मजुरांचा जत्था गोरेगावात पोहचला त्यांची ही व्यवस्था करून सर्व मजुरांना कोहमारा येथे सोडण्यात आले. या सामाजिक कार्यात नगराध्यक्ष आशिष बारेवार, टिटू जैन, विलास मेश्राम, पुरुषोत्तम बावनकर, जयमलसिंग सग्गू, नितीन बारेवार, प्रफुल्ल देशमुख, करण जैन, तरूण पाटील,जी.व्ही गाढवे यांनी सहकार्य केले.
अन नतमस्तक झाले अकोलावासीय
कोरानासारख्या रोगाची दहशत असताना गोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ऐन गरजेच्यावेळी दिलेली मदत व सहानुभूतीने अकोलावासीयांचे डोळे पानावले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणी साधी विचारपूस करणारे नसताना चहा, नास्ता पाण्याची व्यवस्था करणाºया गोरेगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांना सलाम करीत कोहमाराकडे रवाना झाले.
मदतीसाठी सरसावले गोरेगाववासी
बाहेरील राज्यातील मजुरांचे जत्थेच्या जत्थे गोरेगावात येताना त्यांच्या चहापाण्याचा आणि जेवनाचा खर्च गोरेगाव मथंन ग्रुप व गायत्री भारत गॅस एजन्सीने उचलला आहे. आशिष बारेवार, संजू लोखंडे, रेखलाल टेभंरे, पोलीस उपनिरीक्षक देशमुख, कल्लू जायस्वाल, जी.व्ही.गाढवे, प्रणय कोल्हे, अजय पालेवार, स्मित सांगोळे, हरीश चिचखेडे, डॉ.राहूल बिसेन, राजेश ठाकरे, विलास मेश्राम, संजय घासले, सोनू पाटील, महेंद्र अग्रवाल यांनी मजुरांना मदत केली.