निराधारांचे मानधन रखडल्याने निराधारांची उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:08+5:302021-09-06T04:33:08+5:30
लोहारा : तालुक्यातील अनेक गावातील निराधार, वयोवृद्ध, दिव्यांगांचे गेल्या ६ महिन्यांपासून मानधन रखडले आहे. यामुळे निराधारांवर उपासमारीची वेळ आली ...
लोहारा : तालुक्यातील अनेक गावातील निराधार, वयोवृद्ध, दिव्यांगांचे गेल्या ६ महिन्यांपासून मानधन रखडले आहे. यामुळे निराधारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षांपासून आचारसंहितेचे निर्बंध, अवकाळी पावसाचा फटका आणि त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे निराधारांचे कंबरडे मोडले होते. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट असल्याने मानधन वेळेवर मिळेल का याविषयी लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील निराधार, वयोवृद्ध व हजारो दिव्यांग बांधवांची गेल्या ४-६ महिन्यांपासून मानधन मिळेना, गावात शोधले तर काम मिळेना अशी गत झाली आहे. म्हणून निराधारांचे मानधन रखडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने या निराश्रित निराधार लाभार्थ्यांचा अंत न पाहता त्यांचे मानधन तत्काळ देण्यात यावे, अशी मागणी निराधार, वयोवृद्ध व दिव्यांग बांधवाकडून केली जात आहे. विशेषता देवरी तहसील कार्यालयातील तहसीलदारांची बदली होऊन महिना लोटत आहे. तरीदेखील तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. निराधारांसह, शेतीची कामे, रजिस्ट्रीची कामे, शासनाच्या योजना तालुक्यातील लोकांपर्यंत पोहचत नसल्याने तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
-----------------------------
आता तिसऱ्या लाटेची भीती
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा तर लॉकडाऊन होणार नाही ना भीती वाटू लागली आहे. पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊनसारखे लॉकडाऊन लागले तर या निराधार लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. परिणामी त्यांच्यावर उपासमारीमुळे जीव गमावण्याची वेळ येऊ नये त्याकरिता म्हणून शासनाने या लाभार्थ्यांचे ४-६ महिन्याचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर तत्काळ जमा करावे, अशी मागणी देवरी तालुक्यातील निराधार, वयोवृद्ध व अपंग लाभार्थी करीत आहेत.