चक्रीवादळाने अनेकांना केले बेघर
By admin | Published: May 25, 2016 02:04 AM2016-05-25T02:04:35+5:302016-05-25T02:04:35+5:30
जिल्ह्यात सर्वत्र शनिवार (दि.२१) आलेल्या चक्रीवादळाने भयंकर कहर करून विनाशलिलेचा खेळ खेळला.
गोंदिया : जिल्ह्यात सर्वत्र शनिवार (दि.२१) आलेल्या चक्रीवादळाने भयंकर कहर करून विनाशलिलेचा खेळ खेळला. यात शासकीय इमारतींसह अनेक कुटुंबांचे घरे कोसळली, जनावरांचे गोठेसुद्धा उद्धस्त झालीत. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावरील छत नाहिसे होवून त्यांच्यावर बेघर होण्याची पाळी आली आहे. शासनाने त्वरित भरपाई देवून बाधित नागरिकांचे सांत्वन करावे, अशी मागणी अनेक राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
४० कुटुंब बाधित
गोंदिया : शनिवारच्या चक्रीवादळ व पावसाने तालुक्यातील नवरगाव येथे मोठा कहर केला. येथील ३० ते ४० लोकांचे मोठेच नुकसान झाले आहे तर एकट्या कुवरलाल बहेकार यांचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. गावातील कर्मचारी म्हणून तलाठी व ग्रामसेवकाने पंचनामा केला. सरपंच रवी हेमणे, उपसरपंच किशोर गडपायले, पं.स. सदस्य बंटी केलापे, हरिशचंद्र कावळे व सर्व बाधित गावकऱ्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
कित्येक घरांची पडझड
पांढरी : सडक-अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील गावांमध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळाने कित्येक घरांची पडझड झाली असून काहींचे मोठे नुकसान झाले आहे. याची माहिती येथील तलाठी एस.के. कापसे व तहसील कार्यालय सडक-अर्जुनी यांना देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडझड झालेल्या घरांचे व अन्य मालमत्तेची योग्य चौकशी करून पंचनामा करावा व त्यांना लाभ देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. या चक्रीवादळाने प्राणहानी झालेली नाही.
शाळा इमारतींचे नुकसान
तिरोडा : तालुक्यात शनिवारी आलेल्या चक्रीवादळाने तीन शाळा बाधित होवून मोठे नुकसान झाले आहे. या शाळांच्या दुरूस्तीसाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात यावे, अशी मागणी जि.प. सदस्य व बांधकाम व कृषी समितीचे सभापती कैलाश पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
बाधित झालेल्या शाळांमध्ये जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा, जि.प. उच्च प्राथमिक शाळा बोदा व जि.प. प्राथमिक शाळा परसवाडा यांचा समावेश आहे. या तिन्ही जिल्हा परिषदेच्या शाळांचे मोठेच नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत नवीन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी गैरसोय निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी क्षतिग्रस्त झालेल्या शाळांच्या वर्गखोल्यांसाठी नैसर्गिक आपत्ती निधी त्वरित मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
घरांसह गोठे बाधित
गोंदिया : शनिवारी आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेक घरे व गुरांचे गोठे तिरोडा तालुक्यात बाधित झाली आहेत. त्या नुकसानग्रस्तांना शासनाकडून त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जि.प. सदस्य व बांधकाम व कृषी समितीचे सभापती कैलाश पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
तिरोडा तालुक्यात अर्जुनी, सावरा, पिपरिया, चांदोरी खुर्द, खैरलांजी, परसवाडा, बोदा, अत्री, गोंडमोहाळी, किंडगीपार, बोंडराणी, बघोली, बिहिरीया, इंदोरा बु., करटी बु. व सेजगाव परिसरात व तालुक्यात काही गावांमध्ये शनिवारी दुपारी २.३० वाजता चक्रीवादळ सुरू झाले. त्यात काही घरांचे, जनावरांच्या गोठ्यांचे व शासकीय इमारतींचे छत उडालेले आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त भागाचा सर्वे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.