जखम गुडघ्याला, पट्टी कपाळाला

By admin | Published: July 2, 2014 11:21 PM2014-07-02T23:21:18+5:302014-07-02T23:21:18+5:30

नगर परिषदेकडून शहरात विविध योजनेंंतर्गत रस्ता दुरूस्तीची कामे केली जात आहेत. कोट्यवधींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या या कामांत गरज असलेल्या रस्त्यांना हुलकावणी देत चांगल्या रस्त्यांवर

Hurt the knee, the neck of the forehead | जखम गुडघ्याला, पट्टी कपाळाला

जखम गुडघ्याला, पट्टी कपाळाला

Next

गोंदिया : नगर परिषदेकडून शहरात विविध योजनेंंतर्गत रस्ता दुरूस्तीची कामे केली जात आहेत. कोट्यवधींच्या निधीतून करण्यात येत असलेल्या या कामांत गरज असलेल्या रस्त्यांना हुलकावणी देत चांगल्या रस्त्यांवर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे जखम गुडघ्याला आणि पट्टी कपाळाला अशी स्थिती रस्ता दुरस्तीच्या बाबतीत निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे सिव्हील लाइंस परिसरातील कित्येक रस्ते वाहनांसाठी तर सोडाच पायी चालण्यासारखेही राहिलेले नाहीत. मात्र त्याकडे पालिकेचे साफ दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची पार वाताहात झाली आहे. अधिकांश रस्ते उखडून गेले असून खड्डेमय झाले आहे. पाऊस पडताच या रस्त्यावरून चालणेही कठीण होणार आहे. पण नगर परिषदेला त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. जनआक्रोश बघता नगर परिषदेने विविध योजनांतून रस्ता दुरूस्तीची कामे तर सुरू केली, पण त्यात कोणत्या रस्त्यांना प्राधान्य द्यावे याबाबतचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील विविध प्रभागांतील रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण सुरू आहे. मात्र यातील अनेक रस्त्यांचे काम पाहता खरोखरच त्या मार्गावर पुन्हा-पुन्हा डांबरीकरण करण्याची गरज होती का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील जे रस्ते खराब झालेले नाहीत त्यांची दुरूस्ती करण्यात आली, मात्र जे पूर्णपणे उखडून गेले त्यांच्याकडे कुणी फिरकूनही बघितले नाही. यामध्ये शहराच्या मध्यवस्तीमधील सिव्हील लाईंन परिसरातील रस्त्यांवरून एक फेरफटका मारल्यास नगर परिषदेच्या नाकर्तेपणाबद्दल आणि या वॉर्डातील नगरसेवकांच्या दुर्लक्षितपणाबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.
कोणत्याही शहरातील सिव्हील लाईंन परिसर म्हटल्यानंतर तो त्या शहरातील सर्वाधित सोयीसुविधांनी युक्त असतो. गुळगुळीत रस्ते व साफसफाई ही त्या परिसराची विशेष ओळख असते. गोंदियातील सिव्हील लाईन परिसर मात्र याला याबाबतीत अगदी उलट आहे. नेहरू चौकापासून सुरू होणारी रस्त्यांची दुर्गती हनुमान मंदिर ते बाजपेयी ड्रायव्हींग स्कूल रस्ता, नेहरू चौक ते पुढे मामा चौक अशा मुख्य रस्त्यांवरही स्पष्टपणे दिसून येते. या परिसरातील नागरिक या दुर्गतीला कंटाळून गेले आहेत. येथील नागरिकांनी निवडून दिलेले नगरसेवक सुद्धा यावर काहीच आवाज उठवायला तयार नाहीत.
अन्य प्रभागांवर नजर टाकल्यास रस्त्यांची समस्या सिव्हील लाईंनच्या तुलनेत कमी दिसून येते. असे असतानाही तेथे मात्र रस्त्यांची कामे जोमात सुरू आहेत. मग सिव्हील लाईंन परिसरच का उपेक्षित? असा सवाल आता येथील रहिवासी करू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Hurt the knee, the neck of the forehead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.