पतीने पत्नीला जिवंत जाळले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:18 PM2018-04-24T23:18:05+5:302018-04-24T23:18:05+5:30
घरगुती कारणातून पतीने पत्नीवर रॉकेल टाकून तिला जीवंत जाळले. ८० टक्के भाजलेल्या त्या विवाहीतेचा १० दिवसानंतर सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. चित्रकला भुमेश्वर कांबळे (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : घरगुती कारणातून पतीने पत्नीवर रॉकेल टाकून तिला जीवंत जाळले. ८० टक्के भाजलेल्या त्या विवाहीतेचा १० दिवसानंतर सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. चित्रकला भुमेश्वर कांबळे (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
चित्रकलाचा माहेर आमगाव तालुक्याच्या कातुर्ली येथील आहे. तिचे वडील झींगर सापकू मोहनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रकलाचे पती भुमेश्वर कांबळे याने १४ एप्रिल रोजी घराचे दार बंद करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले. घरात आरडा ओरड करून दार उघडून चित्रकला रस्त्यावर आल्याने मोहल्लातील लोकांनी तिच्या दिशेने धाव घेतली. हा प्रकार पाहताच चित्रकलाचे भासरे यांनी धाव घेऊन वाकरच्या मदतीने त्या आगीवर नियंत्रण आणले. हा प्रकार घडल्यानंतर सत्यता लोकांना सांगू नकोस तुझा लहान मुलगा आहे, त्याचा सांभाळ कोण करेल असे विविध प्रकारचे कारण सांगून चित्रकलाचे मनपरिवर्तन करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडीलाने केला आहे.
त्यामुळे तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयानात जाळणाऱ्याचे नाव सांगितले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. १४ एप्रिल रोजी ८० टक्के भाजलेल्या चित्रकलाचे प्रकरण दडपण्यासाठी नागपूरच्या एका खासगी रूग्णालयात तीन दिवस ठेवण्यात आले. त्या तीन दिवसाचे बिल भरण्यास तिच्या घरच्यांनी असहकार्य दाखवित तिला खासगी रूग्णालयातून नागपूरच्या शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा तिला गोंदियाच्या बी.जे. हास्पीटलमध्ये २३ एप्रिल रोजी सकाळी दाखल केल्याने सायंकाळीच तिचा मृत्यू झाला. चित्रकलाला एक तीन वर्षाचा मुलगा असल्याचे झिंगर मोहनकर यांचे म्हणणे आहे.
ही दुसरी घटना
चित्रकलाचे लग्न पाच वर्षापूर्वी झाले होते. भुमेश्वर पासून चित्रकलाला एक साडे तीन वर्षाचा मुलगा आहे. लग्नाच्या एक वर्षानंतरही भुमेश्वरने चित्रकलाला जाळले होते. मात्र त्या प्रकरणात ती बचावली होती. मात्र आता घर बंद करून मोठ्या प्रमाणात रॉटेल ओतून तिला जाळण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी सासरची मंडळी प्रयत्न करीत असल्याची व्यथा उत्तरीय तपासणी दरम्यान आलेल्या चित्रकलाच्या वडीलाने सांगितली.
मुलाच्या जीवासाठी तिने दिले दुसरेच बयान
घरगुती वादातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळले. लग्नापासूनच चित्रकलाचा पती चित्रकलाला त्रास द्यायचा यापूर्वीही माझ्या मुलीला जाळले होते. ती जळालेली साडी आजही सुरक्षीत ठेवली असल्याचे झींगर सापकू मोहनकर यांचे म्हणणे आहे. चित्रकलाने मृत्यूपूर्व बयानात सत्य माहिती जर पोलिसांना किंवा तहसीलदाराला दिली तर तिच्या पतीला कोठडीत जावे लागेल व तिच्या लहान मुलाचा सांभाळ कोण करेल असा प्रश्न सासरच्यांनी चित्रकला समोर उभा केला. त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी तिने दिव्यामुळे जळाल्याची माहिती मृत्यूपूर्व बयानात दिली. परंतु जळाल्यानंतर उपचारासाठी नागपूरच्या खासगी रूग्णालयात चित्रकला उपचार घेत असताना भेटायला गेलेल्या वडीलाला तिने या प्रकरणाची सत्यता सांगितली असे झींगर सापकू मोहनकर यांचे म्हणणे आहे.
जळाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी दिली
चित्रकला १४ एप्रिल रोजी सकाळे ११ वाजता ८० टक्के जळाली.मात्र ती जळाल्याची माहिती तिच्या पतीने किंवा सासरच्यांनी त्यावेळी दिली नाही. दुसऱ्या दिवशी चित्रकलाच्या भावाच्या मोबाईलवर फोन करुन ही बातमी देण्यात आली. त्यानंतर तिचे वडील मुलीला पाहण्यासाठी नागपूरला गेले. घटनेची माहिती दुसºया दिवशी देणे म्हणजे प्रकरण दडपण्यासाठी त्यांना वेळ पाहीजे होती का असा सवाल झींगर सापकू मोहनकर यांचा आहे.