पतीला सात वर्षांचा सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:46 AM2017-11-24T00:46:55+5:302017-11-24T00:47:41+5:30
हुंड्यासाठी पत्नीचा छड करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हुंड्यासाठी पत्नीचा छड करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही सुनावणी बुधवारी (दि.२२) रोजी झाली.
सावरीटोला येथील रहिवासी भानुलाल पुनाजी दमाहे याचा विवाह सन २००२ मध्ये तिरोडा तालुक्याच्या बोहरा गावातील रहिवासी प्रमिला राजेंद्रसिंह हिरापुरे यांची मुलगी संगीतासह झाला होता. लग्नानंतर आरोपी पती व सासरा पुनाजी होलू दमाहे, सासू बलवंता दमाहे तसेच दीर शिवा दमाहे हे सर्व संगीताला माहेरून हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याची माहिती संगीताने वेळोवेळी आपल्या माहेरच्यांना दिली होती. तसेच पतीद्वारे धर्म परिवर्तन करण्यासाठीसुद्धा दबाव घातला जात होता. याचा विरोध केल्यावर आरोपी पती मंगळसूत्र व टिकली लावण्यास प्रतिबंध घालून त्रास देवू लागला. पतीकडून होणाºया सततच्या छळाने त्रस्त होवून संगीताने ८ जानेवारी २००९ रोजी कीटकनाशकाचे प्राशन केले. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मृतक संगीताच्या आईला मिळताच त्यांनी सर्व आरोपींची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात केली.
यानंतर पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३०४ (ब), ४९८ (अ) व ३४ अन्वये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात १० साक्षीदार व वैद्यकीय रिपोर्टच्या आधारावर जिल्हा सत्र न्यायाधीश क्र.२ माधुरी आनंद यांनी मुख्य आरोपी पतीला कलम ३०४ (ब) अन्वये सात वर्षांचा कारावास व कलम ४९८ (अ) व तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच इतर तीन आरोपी पुनाजी दमाहे, बलवंता पुनाजी दमाहे व शिवा दमाहे यांना मुक्त करण्यात आले. सदर प्रकरणात पोलिसांच्या वतीने तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार यांनी चौकशी केली. या प्रकरणात सरकारच्या वतीने सरकारी वकील कैलाश खंडेलवाल व प्रकाश तोलानी यांनी बाजू मांडली.