सिंधी शाळा व्यवस्थापनाच्या राजकारणात मी बळीचा बकरा

By admin | Published: January 23, 2017 12:26 AM2017-01-23T00:26:01+5:302017-01-23T00:26:01+5:30

सिंधी शिक्षण संस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात माझ्यासारख्या छोट्या कर्मचाऱ्याकडून पाच वर्षात ४६ लाखांचा अपहार कसा होऊ शकतो?

I am a scapegoat in the management of Sindhi school management | सिंधी शाळा व्यवस्थापनाच्या राजकारणात मी बळीचा बकरा

सिंधी शाळा व्यवस्थापनाच्या राजकारणात मी बळीचा बकरा

Next

पत्रपरिषद : दोन्ही पायांनी अपंग अनिता बिसेनचा आरोप
गोंदिया : सिंधी शिक्षण संस्थेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात माझ्यासारख्या छोट्या कर्मचाऱ्याकडून पाच वर्षात ४६ लाखांचा अपहार कसा होऊ शकतो? मी कोणताही अपहार केलेला नाही. जे काही व्यवहार केले ते मुख्याध्यापिकेच्या आणि शाळा संचालकांच्या निर्देशानुसार केले. सर्व व्यवहाराची सर्वांना कल्पना आहे. असे असताना केवळ सिंधी शिक्षण संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या पदाधिकाऱ्यांवर आळ घेण्यासाठी मला बळीचा बकरा बनविले जात आहे, असा आरोप संस्थेच्या माजी कर्मचारी अनिता बिसेन यांनी केला.
दोन्ही पायांनी अपंग असलेल्या अनिता बिसेन यांनी पत्रकारांपुढे आपली व्यथा मांडली. सिंधी शिक्षण संस्थेत वर्ष २००० पासून तर २०१५ पर्यंत त्या लिपिक म्हणून कार्यरत होत्या. २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या नोकरीचा राजीनामा देऊन बडोदा येथे पतीकडे गेल्या. दरम्यान संस्थेचे सदस्य राकेश होपचंदानी यांनी काही दिवसांपूर्वी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत अनिता बिसेन यांनी त्यांच्या कार्यकाळापैकी २०१० ते २०१५ यादरम्यान विद्यार्थ्यांच्या फी वसुलीच्या रकमेत ४६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. त्यावरून पोलिसांनी बिसेन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. आता त्यांना दर सोमवारी गोंदिया शहर ठाण्यात हजेरी लावावी लागत आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसताना आणि सहा महिन्यांचे बाळ असताना शाळेचे काही पदाधिकारी व पोलीस आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत आहे. तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष भगत ठकराणी यांनी अपहार केल्याचे सांगा, आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही, असे म्हणून संस्थेच्या अंतर्गत राजकारणात मला बळीचा बकरा बनवित आहे, या त्रासातून मला वाचवा, अशी मागणी केली. यावेळी मानवाधिकार संघटनेच्या सरचिटणीस धर्मिष्ठा सेंगर उपस्थित होत्या.

अनिता बिसेनवर शाळा समिती सदस्याच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ४७७ (ए) ४०९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयानेच त्यांना दर सोमवारी सकाळी ११ ते ५ वाजतादरम्यान पोलीस ठाण्यास भेट देण्याचे आदेश दिले आहे. आम्ही कोणताही त्रास देत नाही.
- जितेंद्र बोरकर,
सहायक पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, गोंदिया.

 

Web Title: I am a scapegoat in the management of Sindhi school management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.