साखरेपेक्षा गूळच खातोय अधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:21 AM2021-06-26T04:21:05+5:302021-06-26T04:21:05+5:30

गोंदिया : कोरोनाने अनेक बदल घडविले आहेत. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, आहार-विहारसुद्धा बदलला आहे. स्वयंपाकघरातील मॅगी, नुडल्सची जागा आता पाैष्टिक ...

I eat jaggery more than sugar | साखरेपेक्षा गूळच खातोय अधिक भाव

साखरेपेक्षा गूळच खातोय अधिक भाव

Next

गोंदिया : कोरोनाने अनेक बदल घडविले आहेत. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार, आहार-विहारसुद्धा बदलला आहे. स्वयंपाकघरातील मॅगी, नुडल्सची जागा आता पाैष्टिक आहारांनी घेतली आहे. गृहिणीदेखील आपल्या कुटुंबाच्या आरोग्याप्रती सजग झाल्या आहेत. चहाऐवजी गूळ आणि तुळशीचा काढा दिला जात आहे. गूळ हे आरोग्यासाठी चांगले असल्याने साखरेला बाजूला सारत आता गुळाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच साखरेपेक्षा गूळ अधिक भाव खात असल्याचे चित्र आहे.

आधीच्या काळी घराघरांत गुळाला अनन्यसाधारण मागणी होती. काळानुरूप बदल होत गेल्याने गुळाचा वापर कमी झाला. साखर कमी किमतीत मिळत असल्याने तिचा वापर वाढला, तर गुळाचा खप कमी झाला. मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या व आजीबाईच्या बटव्यातून साकारलेल्या विविध कल्पकतेतून गुळाला वाव मिळत गेला. गूळ हा गुणधर्माने गरम समजला जातो. त्याचा आजही अनेक पदार्थांत वापर केला जातो. विशेषत: लाडूमध्ये याचा वापर होत असतो. मात्र, चहा व अन्य भाज्यांमध्येही गुळाचा वापर होतो. परिणामी, साखर आणि गुळाला समतुल्य मागणी असल्याचे दिसून येते. गत २० वर्षांपासून गूळ आणि साखर यांच्या दरावर नजर घातल्यास त्यात दुपटीने वाढ झाल्याचे समजते. सद्य:स्थितीला गुळाचे भाव साखरेपेक्षा २० ते २५ रुपये प्रतिकिलो जास्त आहेत. मात्र, गुळाची मागणी कमी झालेली नाही. अपेक्षेनुरूप गुळाच्या बनविण्याच्या पद्धतीत फारसा बदल झाला नसला तरी शुद्ध रूपात मिळणाऱ्या गुळाला अधिक मागणी आहे. त्यात ५ ते १० रुपये किंमतही अधिक आहे.

------------------------

आरोग्यासाठी गूळ चांगला

पूर्वीच्या काळी गुळाचाच वापर दैनंदिन जीवनात होत होता. नवनवे प्रयोग होत गेले व आता साखर आली. त्यामुळे प्रत्येक वस्तूत सारखेची गरज भासू लागली. मात्र, साखरेत केमिकल्सचा वापर होत असून ते शरीरासाठी घातक आहे.

-डॉ. कमलापती खोब्रागडे, गोंदिया

---------------------

गुळाचा चहा बनले स्टेटस

-पूर्वी व आजच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल दिसून येत आहे. आधीच्या काळात गुळाचा वापर अधिक प्रमाणात व्हायचा. कालांतराने याची जागा साखरेने घेतली. विशेष म्हणजे, साखरेपेक्षा गूळ महाग आहे. किंबहुना यामुळेच साखरेचा वापर वाढत गेला. अनेक जण गुळाचा चहा घेणे म्हणजे आजच्या स्थितीत अडाणीपणा समजतात. मात्र, औषधी गुणधर्म असलेल्या गुळाचा वापर चांगलाच असे तज्ज्ञही सांगतात. त्याचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे.

- बाजारात आजघडीला गुळाचे भाव साखरेपेक्षा अधिक आहेत. मात्र, गुळाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. गुळाचा चहा पिणे म्हणजे स्टेटस सिंबॉल बनल्याचेही अनेक जण सांगतात. मात्र, काळानुरूप त्याला अंगीकारणे याला वेळ लागणार आहे; परंतु त्यात वावगे असे काहीच नाही.

--------------------

गावात मात्र साखरच

पूर्वी गावात गुळाचा अधिक वापर व्हायचा. सकाळ झाली की दुकानात गूळ आणि चहापत्तीच विकायची. मात्र, आता चहापत्ती आणि साखरेची मागणी केली जाते. गावात आता साखरच हवी आहे. गुळाचा वापर कमी झाल्याचे दिसून येत आहे. जुनी मंडळी मात्र गुळाचा वापर करतात.

-सुनील चौधरी, दुकानदार

-----------------------

शहरात साखर आणि गुळालाही सारखीच मागणी

शहरातील बाजारपेठेत साखर व गुळाला समतुल्य मागणी आहे काय? असे कधी कधी वाटते. सिझनमध्ये गुळाला अधिक मागणी असते. मात्र, त्या तुलनेने साखरेचाही खप अधिक आहे. आता काळानुरूप बदल होत असला तरी अनेक जण गुळाचा चहा प्यायला लागल्याचेही सांगतात. दरम्यान, शहरातील बाजारपेठेत गुळाचे भाव वधारले आहेत.

-दुर्गादास बिसेन, व्यापारी

----------------

शहराची लोकसंख्या वाढत असून, किराणा साहित्यांच्या मागणीतही वाढ झाली आहे. शहरात साखर आणि गुळाला सारखीच मागणी असल्याचे जाणवते. साखर ३८ ते ४० रुपये या दराने विकली जाते, तर गूळ ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. संक्रांतीच्या काळात गुळाला जास्त मागणी असते. मात्र, त्यानंतर थोडीफार मागणी कमी होते.

-संजय अमृते, व्यापारी

Web Title: I eat jaggery more than sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.