मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:04+5:302021-08-25T04:34:04+5:30
गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखा आपलाही नावलौकिक व्हावा, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाच-गाणे ऐकत ...
गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखा आपलाही नावलौकिक व्हावा, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाच-गाणे ऐकत व त्याचे प्रात्यक्षिक करत मुंबईचा रस्ता धरणाऱ्या अनेक मुला-मुलींना रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. जिल्हा पोलिसांनीही अनेकदा ‘ऑपरेशन मुस्कान’च्या मोहिमेत घरातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना रेल्वेस्थानक व बसस्थानकावरून पकडून पालकांच्या स्वाधीन केले.
जिल्ह्यातील अनेक मुला-मुलींनी हिरो-हिरोईन बनण्यासाठी आपले घर सोडून मुंबईदेखील गाठली आहे. काही मुले-मुली बेपत्ता होतात, तर काही मुले-मुली स्वत:हून घर सोडून देतात. गोंदिया जिल्ह्यातून हरविलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुला-मुलींना ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पकडून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
.......................
कोणाला बंगला, गाडीचे आकर्षण, तर कोणाला घरातील वादाचा कंटाळा
- बहुतांश मुला-मुलींना आपला बंगला असावा, गाडी असावी असे आकर्षण असल्याने, ते याचा ध्यास ठेवून घराबाहेर पडतात.
- घराबाहेर पडल्याशिवाय आपला विकास होणार नाही, जग कसे आहे हे घराबाहेर पडल्यानंतरच कळेल, असे समजून मुले-मुली घराबाहेर पडतात.
- घरात आई-वडिलांचा सतत होणारा वाद, त्यांची कटकट यामुळे घर सोडून अनेक मुले घरातून बाहेर पडतात.
...............
...म्हणून घर सोडले
आपल्याला अभिनेत्री व्हायचे आहे. आई-वडिलांच्या संमतीने मी घराबाहेर पडले. मुंबईत नाटक, चित्रपटात काम करून आपलेही नाव समाजात मोठे करू, या आशेने मुंबईला गेले. काही वर्षे काम केले, परंतु तिथे कुणाची मदत होत नसल्याने मी परत आले, असे एका मुलीने म्हटले आहे.
.............
मला सिनेमात काम करायचे आहे, म्हणून गोंदिया सोडून मुंबई गाठली. अनेक सिनेमात व सीरियलमध्ये काम करून आपले नाव मोठे करण्याचे स्वप्न रंगवित आहे. कामाला जोमाने सुरुवातही केली. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. आता गाडी पुन्हा हळूहळू सुरू झाली आहे, असे एका गोंदियातील तरुणाने सांगितले.
.............
मिळालेली बालके चाईल्ड लाईनच्या स्वाधीन
रेल्वे स्थानकावर दरराेज बंदोबस्त लावला जातो. या बंदोबस्तादरम्यान रेल्वे स्थानकावर एकटा मुलगा किंवा मुलगी असेल, तर आमच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून विचारपूस केली जाते. आम्हाला वाटले, की मुलगा-मुलगी घर सोडून आलेत, तर चाईल्ड लाईनसोबत संपर्क साधून त्यांना त्यांच्या स्वाधीन करण्यात येते.
- नंद बहादूर, रेल्वे सुरक्षा बल अधिकारी, गोंदिया.
.....
रेल्वे स्थानकावर सापडलेली मुले-मुली
सन २०१९-२०- मुले- ०९, मुली- २६
सन २०२०-२१- मुले- ०१, मुली- ०२