मेरे पास सिर्फ माँ है! (ङमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:15+5:302021-06-06T04:22:15+5:30
नरेश रहिले गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील मातापित्यांचे छत्र हरपले. आताही कोरोनाचे थैमान ...
नरेश रहिले
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील मातापित्यांचे छत्र हरपले. आताही कोरोनाचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या काळात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोना सोबतची झुंज अपयशी ठरली. गोंदिया जिल्ह्यातील तब्बल १९६ बालकांनी कोरोनामुळे आपले आई-बाबा गमावले आहेत. यातील १४८ बालके ‘मेरे पास सिर्फ माँ है’असे म्हणतात.
मातृ-पितृ छत्र हरविलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १९६ बालके अशी आढळलीत. त्यांच्या आई-बाबा यांच्यापैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला. तर ३ बालकांचे आई-वडील दोन्ही मृत्यू पावले. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ६९१ जणांचा मृत्यू झाला. १८ वर्षाखालील १९६ बालके अशी आढळलीत की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेलेत. जिल्हाभरातील माहितीत ही आकडेवारी समोर आली आहे.
............................
१) वडीलांची उणीव कुणीच भरून काढू शकत नाही
कोराेनाने आमचा हसता-खेळता संसार उद्ध्वस्त झाला. साध्या डोळ्याने न दिसणारा कोरोना आमचा संसार उद्ध्वस्त करून गेला. आई-वडील हेच आधार असतात परंतु घरातील आधारव्यक्ती गेल्याने आता डोळ्यात आश्रृशिवाय काही दिसत नाही.
एक बालक
..............
२) कर्ता व्यक्तीच गेल्याने काहीच कळत नाही
घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारे बाबाच निघून गेल्याने आता घरची सर्व जबाबदारी माझ्या आईवर आली. घरातील दार न ओलांडणाऱी आई आता आमच्यासाठी पदर कंबरेला कसून पोटाची आग विझविण्यासाठी आटापीटा करते. आईला आम्हीही मदत करतो.
एक बालक
...................
३) आईची ममता आहे पण आधारच गेला
कोरोनाने थैमान घातले. कोरोनाने घरातील सर्वांना ग्रासले. या कोरोनाशी लढता-लढता आई आणि आम्ही सावरलो परंतु बाबांचा कोरोनाशी झुंज देतांना मृत्यू झाला. कोरोनामुळे आईची ममता टिकून राहिली. परंतु घराचा आधारवड असलेले बाबा यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यामुळे आमच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
एक बालक
.....................................
तीन बालकांचे आई-बाबांचे छत्र हरपले
- गोंदिया जिल्ह्यातील तीन बालकांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावून घेतले. तीन्ही बालके पालकाविना अनाथ झाले. त्यांच्या जीवनातील दोन्ही आधार निघून गेलेत.
-आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास १८ वर्षाखालील बालकाला बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. गोंदिया जिल्ह्यातील ५६७ बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.
-शासनाने या संगोपन योजनेच्या लाभात वाढ केली असून ११०० रुपये प्रमाणे मदत एप्रिल महिन्यापासून देण्याचे शासनाने ठरविले. परंतु ही मदत अद्याप देण्यात आली नाही.
...............जिल्ह्यातील कोविड रूग्णांचा आढावा
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रूग्ण-४०९११
बरे झालेले रूग्ण- ३९५५६
सद्या उपचार सुरू असलेले रूग्ण- ३६४
एकूण मृत- ६९१