लवकरच मी राज्य मंत्रिमंडळात

By admin | Published: January 2, 2016 08:35 AM2016-01-02T08:35:23+5:302016-01-02T08:35:23+5:30

गेल्या २५ वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे.

I will soon be in the state cabinet | लवकरच मी राज्य मंत्रिमंडळात

लवकरच मी राज्य मंत्रिमंडळात

Next

अर्जुनी मोरगाव : गेल्या २५ वर्षांपासून येथील प्राथमिक शाळेला अनुदान मिळाले नाही. हा प्रश्न अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. मी लवकरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात परतणार आहे. तेव्हा ही समस्या सोडवेन, असे वक्तव्य खासदार नाना पटोले यांनी करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच जी.एम.बी. हायस्कुल व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित वार्षिकोत्सव कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ.बल्लभदास भुतडा तर प्रमुख पाहुणे म्हणून साकोलीचे आ.बाळा काशीवार, नागपूरच्या लेखिका शुभांगी भडभडे, साहित्यिक व लेखिका ज्योती पुजारी, प्रमोद लांजेवार, सुरेश भय्या, हरिदास गहाणे, पर्यवेक्षिका विणा नानोटी, लिना मिसार व सरिता शुक्ला आदी मंचावर उपस्थित होते.
वर्तमान शिक्षण पद्धतीत बदल होत आहेत. सध्या कौशल्य विकास शिक्षण येत आहे. हे शिक्षण प्रत्येक शाळेत दिले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर बैठक आयोजित केली जाणार आहे. कौशल्य विकास शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षित युवापिढीला रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे खा.पटोले म्हणाले. संविधानात मोफत शिक्षणाचा कायदा आहे. मात्र शिक्षणाचा बाजार व व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शिक्षणात सुसूत्रीकरण, एकवाक्यता व समानता आणण्यासाठी विद्धत्तेवर आधारीत शिक्षणपद्धी असली पाहिजे.
आ.काशिवार म्हणाले, विचारांनी मैत्रीचे नाते तयार होते. जीवनात मस्ती जरुर केली पाहिजे. मात्र स्वत:चे ध्येय ठरवावे लागते. जगाचा संरक्षणकर्ता युवक आहे. युवाशक्तीच आधारस्तंभ आहे. युवाशक्तीत प्रचंड ऊर्जा आहे. मात्र त्यांनी आपली बलस्थाने ओळखली पाहिजेत. शिक्षणाचे माणूस कितीही मोठा झाला असला तरी सुसंस्कृतपणा हवाच. संस्काराच्या उणिवेमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. शिक्षक संघटना स्वत:च्या मागण्यांसाठी आंदोलन करतात, मात्र विकसित शैक्षणिक अजेंडासाठी आंदोलन का केली जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. शुभांगी भडभडे म्हणाल्या, शाळा म्हणजे संस्कार मुल्ये रुजविण्याचे केंद्र आहेत. प्रवृत्ती, विकृती व संस्कृती यातील भेद ओळखता आला पाहिजे. संस्कार घडविणे ही केवळ शाळेचीच जबाबदारी नसून ती पालकांचीही आहे.
यावेळी अतिथींच्या हस्ते फ्रॅगरन्स, नवप्रभा व स्पेक्ट्रम या शालेय हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन छाया घाटे व शशीकांत लोणारे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी, शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षीका वीणा नानोटी यांनी केले. छाया घाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अतिथींचा परिचय इंद्रनिल काशीवार यांनी करुन दिला. (तालुका प्रतिनिधी)

घर व शाळा हे संस्काराचे पीठ
४संस्काराचे पहिले पीठ घर आहे तर शाळा हे दुसरे पीठ आहे. संस्क़ार घडविण्याचे हे दोन्ही मुख्य केंद्र आहेत. आई-बाबा हे प्रथम आदर्श असतात. जीवनात त्यांचे महात्म्य फार मोठे आहे. आपल्याला घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाचा आदर प्रत्येकाने केला पाहिजे. शिक्षक हा तिसरा गुरु आहे. त्यांचेशी निरपेक्षवृत्तीने वागले पाहिजे. याव्यतिरिक्त मित्र हा सुद्धा चांगला गुरु ठरू शकतो. त्यांच्या चांगल्या गुणांचा लाभ घेतला पाहिजे, असा सल्ला ज्योती पुजारी यांनी दिला.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
४याप्रसंगी राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी झालेला विद्यार्थी जयेश रुखमोडे, प्रभारी शिक्षक एस.डी. कुंभारे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय अंकिता सोनवाने, नितीन तिरपुडे, जयेंद्र डोंगरवार, श्वेता बोरकर, रिना गभणे, प्राची पवार, सावी गाडेगोणे, पल्लवी ढोमणे, स्रेहा पाटणकर, गायत्री कापगते, मयंक बारापात्रे, गोविंद पनपालीया या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार खा. नाना पटोले व आ. बाळा काशिवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: I will soon be in the state cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.